जामखेड न्युज——
जामखेडमध्ये रणरागिणी रस्त्यावर, हजारो महिलांच्या वतीने कॅन्डल मार्च
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून जरांगे पाटिल हे आमरण उपोषण बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी व मराठा समाजाला आरक्षण लागु करण्यासाठी जामखेड शहरातुन मराठा क्रांती मोर्चा महीला विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्च मध्ये हजारो महिलांनी हातात पेटतील मेनबत्ती घेऊन शहरातुन सहभागी होत मराठा आरक्षणाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत किंवा मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण द्यावे यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे हे उपोषणाला बसले आहेत. त्या पार्श्वभूमीवर जामखेड मध्ये साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या साखळी उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती चिंताजनक होत चालली आहे. मात्र अजुनही सरकारला जाग आलेली नाही. याच अनुषंगाने आज सायंकाळी ७:०० वाजता जामखेड शहरातुन जरांगे पाटील यांच्या अंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा महीला विभागाच्या वतीने हजारो महीलांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला.
कॅन्डल मार्च हजारो महीला व मुली जामखेड तहसील कार्यालयासमोर जमा झाल्या होत्या. यावेळी या सर्व महीलांनी हातात मेणबत्ती पेटवून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणा दिल्या. यानंतर हा कॅन्डल मार्च जामखेड तहसील कार्यालया समोरुन बीड रोड, जयहिंद चौक, मेन रोड, संविधान चौक, खर्डा रोड, खर्डा चौक मार्गे पुन्हा तहसील कार्यालयाकडे आला. महीला या तहसील कार्यालयासमोर आल्या नंतर सर्व महीला व मुलींनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करत सरकारचा निषेध केला. यावेळी उद्या जामखेड बंदची हाक देण्यात आली. शेवटी कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीत म्हणून करण्यात आला.