जामखेड न्युज——
आमदार रोहित पवारांना हायकोर्टाचा दिलासा!!

बारामती ॲग्रो’चे सीईओ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांच्या इंदापूर तालुक्यातील शेटफळ येथील प्लांटवर प्रदूषण मंडळाने गुरुवारी रात्री कारवाई करत प्लांट बंद करण्याची नोटीस दिली होती. मात्र, यावर आता हायकोर्टाने आमदार रोहित पवार यांना दिलासा दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला ठेवण्यात आली आहे. सुनावणीपर्यंत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कुठलीही कारवाई करू नये, असे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे रोहित पवारांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत ‘बारामती ॲग्रो’च्यावतीने हायकोर्टात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या कारवाईच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. यावेळी 6 ऑक्टोबरपर्यंत पुढील कारवाई करू नये, अशा सूचना हायकोर्टाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिल्या आहेत.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने गुरुवारी रात्री दोन वाजता इंदापूर तालुक्यातील शेटेफळ येथे असलेल्या ‘बारामती ॲग्रो’च्या ‘डिस्टलरी प्लांट’ला नोटीस बजावत पुढील 72 तासांत प्लांट बंद करावा, असे आदेश नोटिशीद्वारे दिले होते.

या आदेशाला आमदार रोहित पवार यांच्या ‘बारामती ॲग्रो’च्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत प्रदूषण मंडळाच्या निर्णयाच्या विरोधात दाद मागितली होती. त्यात आता पुढील सुनावणी 6 ऑक्टोबरला होणार आहे, पण तोपर्यंत ‘बारामती ॲग्रो’च्या प्लांटवर कोणतीही कारवाई करू नये, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.



