जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यातील शिक्षण विभागात मानाचा तुरा लक्ष्मीकांत इडलवार यांना राज्य सरकार चा आदर्श पुरस्कार जाहीर – गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे.
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिल्या जाणाऱ्या 2022-23वर्षातील क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आज शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहेत. यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा नायगाव शाळेतील आदर्श, तंत्रस्नेही व उपक्रमशील शिक्षक श्री.लक्ष्मीकांत एकनाथराव ईडलवार सर यांना या वर्षीचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गुणगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्यामुळे जामखेड तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
मागील सोळा वर्षाच्या शैक्षणिक सेवेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सातत्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ केली.
त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक लेख,विविध शालेय व सहशालेय उपक्रम,तसेच शासनाच्या विविध पोर्टलवर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती,राष्ट्रीय स्तरावरच्या विविध शैक्षणिक कार्यशाळेमध्ये सहभाग,विभागीय शिक्षणाच्या वारीमध्ये स्टॉल मांडणी व सादरीकरण, फिरते बाल वाचनालय,पक्षांची खानावळ,दीक्षांत समारंभ,सेल्फी विथ सक्सेस,एक कुटुंब एक कुंडी,मी ज्ञानी होणार ,कवींची भेट नायगावहून थेट, प्राचीन युद्धकला ,संगीतमय लेझीम यासारखे आनंददायी व नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने शाळेत राबवून शाळेच्या सर्वांनी विकासासाठी हातभार लावला.तसेच लोकसहभागाच्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करून शालेय वातावरण निर्मिती केली.या सर्व शैक्षणिक कार्यासाठी गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब,विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख ,मुख्याध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.
याबद्दल जामखेड पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे साहेब ,विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख , मुख्याध्यापक व शिक्षक,शाळा व्यवस्थापन समिती नायगाव ,ग्रामस्थ पालक व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.