जामखेड न्युज——
पुरवणी परीक्षार्थिंना व्यावसायिक अभ्यासक्रमाची संधी
राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या २२ हजार १४४ विद्यार्थ्यांना राज्यातील सर्व विद्यापीठे आणि त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांत पदवीसह तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील औषध निर्माणशास्त्र, एचएमसीटी आदी अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची संधी मिळणार आहे.
बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतरही त्या विद्यार्थ्यांच्या पदवी आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी कोणतेच आदेश आणि कार्यवाही नसल्याने यासंदर्भात मंगळवारी (ता. २९) वृत्त प्रसिद्ध करून उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा कारभार समोर आणला होता. तसेच मागील काही दिवसांपासून या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत पाठपुरावाही केला होता. त्याची आज उच्च व तंत्रशिक्षण शिक्षण विभागाने गांभीर्याने दखल घेतली.
त्यासाठी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर आणि तंत्र शिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या विभागातील विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांना प्रवेश आणि त्यांच्या नोंदणीचे आदेश जारी केले आहेत. डॉ. देवळाणकर यांनी आपल्या आदेशात बारावीचा एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. यासाठी विद्यापीठ, संलग्न महाविद्यालय स्तरावर प्रवेश देण्याचे आदेश जारी केले आहेत. यात त्यांनी कला, विज्ञान व वाणिज्य विद्याशाखेच्या पदवी प्रवेशापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
तसेच या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) मार्गदर्शक सूचनेनुसार १८० शैक्षणिक दिवस भरतील याचीही दक्षता घेण्याचे आदेश डॉ. देवळाणकर यांनी दिले आहेत.नोंदणीचे आवाहनपुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशास पात्र असलेल्या उमेदवारांना संस्थास्तरीय प्रथम व थेट द्वितीय वर्ष पदविका प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी संचालनालयाच्या dtemaharashtra.gov.in संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. अशा नोंदणी केलेल्या उमेदवारांना संस्था स्तरावरील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल व प्रथम वर्ष पदविका आणि थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमास प्रवेश निश्चित करता येईल, असे तंत्र शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विनोद मोहीतकर यांनी स्पष्ट केले आहे.