जामखेड शहरातील नळाला चक्क गटाराचे पाणी, यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जामखेड येथील नळ पाणी पुरवठा योजनेद्वारे चक्क गटारातील पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांनी नगरपरिषदेला सूचना करून देखील याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
जामखेड शहराला भुतवडा तलावातून पाणीपुरवठा केला जातो. ही योजना अतिशय जुनी आहे पाटोदा तालुक्यातून रामेश्वर धबधब्यातून भुतवडा तलावाला पाणी येते. तलावाचा भूभाग जामखेड शहराच्या उंची पेक्षा उंचावर आहे. त्यामुळे तलावातून कोणताही वीज व इंधन न वापरता थेट पाण्याच्या टाकीत पाणी येते. पाण्याची टाकी ही जामखेड शहरापेक्षा उंचावर असल्यामुळे तेथून कॉक फिरवला की थेट जामखेड शहरात घरोघर नळाद्वारे पाणी येते. कदाचित महाराष्ट्रात अशी योजना इतर कोठे नसावी. कारण या योजनेला कसलेही इंधन अथवा वीज वापरावी लागत नाही. पूर्वी जामखेडला लोकसंख्या कमी असताना दिवसातून दोन वेळा सकाळी व संध्याकाळी नळाला पाणी सुटायचे. नंतर दिवसातून एक वेळा नियमित पाणी सुटू लागले तलावातून आलेल्या पाण्याला पूर्वीपासूनच विशेष शुद्धीकरण केले जात नाही. त्यामुळे जामखेडकरांना पूर्वीपासूनच गढूळ पाण्याची सवय लागली आहे. पावसाळ्यात तर हे पाणी अतिशय गढूळ असते. आता तर आठवड्यातून एकदा एक तास पाणी मिळत आहे.
जामखेड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली व शहराचा विस्तार वाढत गेला योजना मात्र तीच. त्यातच भुतवडा तलावातून त्या परिसरातील लोक पाण्याचा उपसा करतात त्यामुळे गेली मागील अनेक वर्षापासून जामखेड शहराला आठवड्यातून केवळ एकदाच पाणीपुरवठा केला जातो. जामखेड करही कसलीही तक्रार न करता आठवडाभराचे पाणी साठवून ठेवतात.
किमान आठवड्यातून एकदा होणारा पाणीपुरवठा पिण्यास योग्य असावा. इतकी तरी माफक अपेक्षा जामखेडकरांची असायला हरकत नाही. बाजार तळ भागांमध्ये आठवड्यातून एकदा दर रविवारी सकाळी नऊ वाजता पाणी सुटते. हे पाणी सुरुवातीला पाच मिनिटे काळे कुट्ट रंगाचे असते. व त्याची दुर्गंधी गटारीतल्या पाण्यासारखी येते. म्हणजेच नळातून चक्क गटारीचे पाणी येते. हा प्रकार अनेक महिन्यांपासून सुरू आहे.
नागरिकांमध्ये याबाबत कुजबूजही आहे काही नागरिकांनी नगर परिषदेला याबाबत सूचनाही केल्या आहेत. अनेकांनी याचे व्हिडिओ तयार केले आहेत. परंतु प्रशासन मात्र हात बांधून बसले आहे. जलवाहिनी कुठेतरी फुटलेली असावी. परंतु पूर्ण बाजार तळामध्ये काँक्रिटीकरण व पेविंग ब्लॉक बसवलेले असल्यामुळे ते शोधता येत नाही त्याचबरोबर रस्ते ही काँक्रीटचे झालेले असल्यामुळे व गल्लोगल्ली पेविंग ब्लॉक बसवले गेल्यामुळे जलवाहिनी खोदता येत नाही. व कोठे जलवाहिनी फुटली आहेत ते तपासता येत नाही. परंतु या सर्व कारणांपेक्षाही नागरिकांचे आरोग्य हे अधिक महत्त्वाचे नाही काय असा सवाल यानिमित्ताने निर्माण होत आहे.
कोरोना सारखे अनेक भयंकर रोग येऊन गेले सध्याही अनेक साथी चालू आहेत शहरातील सर्व दवाखाने हाउसफुल झाले आहेत. अशातच जर पाणीपुरवठ्यात गटारीचे पाणी येत असेल तर नागरीकांच्या आरोग्याचे काय?
नळाचे पाणी तसेही थोडेसे गढूळ असल्यामुळे बहुसंख्य लोक घरीच पाणी शुद्धीकरणासाठी फिल्टर प्युरेटचा वापर करतात. तर काही लोक वर्षभर पाण्याचे जार विकत घेतात. व नळाचे पाणी धुनी भांडी सांडपाण्यासाठी वापरतात. परंतु सर्वसामान्य नागरिकांना मात्र हेच पााणी पिण्यासाठी वापरावे लागते. तेव्हा सामान्य नागरिकांच्या आरोग्याचे काय असाच सवाल निमित्ताने निर्माण होत आहे.