जामखेड न्युज——
कार्यालय भेटीवेळी शाल श्रीफळ ऐवजी शब्द सुमनाने सत्कार करून या पैशाचा विनियोग शालेय विद्यार्थ्यांच्या साहित्यासाठी करावा – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ
जामखेडचे कर्तव्यदक्ष तसेच वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आघाडीवर असलेले गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी गाव पातळीवरील पंचायत समिती अंतर्गत सर्व विभागाना सूचित केले आहे की, भेटीवेळी शाल, श्रीफळ, हार, गुच्छ या वस्तुने सत्कार न करता शब्द सुमनाने करावा व यातील शिल्लक पैसा शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य किंवा खाऊ साठी वापरावा असा आदेश काढला आहे. यामुळे सर्व स्तरातून या आदेशाचे कौतुक होत आहे.
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी आदेशात म्हटले आहे की, गाव पातळीवरील जिल्हा परिषद प्रा. शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुवैदयकीय दवाखाने, तसेच ग्रामपंचायत कार्यालयांस भेट देऊन, विविध विकास कामांची पाहणी करत असतात. यावेळी गट विकास अधिकारी यांचा सत्कार शाल, श्रीफळ, हार, गुच्छ देऊन केला जातो. सत्कार करणेसाठी आवश्यक साहित्य आणणेसाठी विनाकारण पैसा व वेळ खर्च होतो. सत्कार केल्यानंतर शाल, श्रीफळ, हार, गुच्छ याचा कोणत्याही प्रकारचा पुन्हा फायदा होत नाही
सदर वस्तु या वाया जातात. तरी सर्व विभागप्रमुख व ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांना सुचित करणेत येते की, गट विकास अधिकारी यांचा हे गाव पातळीवरील भेटीच्या वेळेस सत्कार / स्वागत करतांना शाल, श्रीफळ, हार, गुच्छ या वस्तुने न
करता शब्द सुमनाने स्वागत करणेत यावा. तसेच या बाबींसाठी लागणारा पैशाचा विनिपयोग शालेय
विदयार्थ्याना/अंगणवाडी बालके शालेय साहित्य (वही, पेन, पुस्तके,) चांगल्या दर्जाचा पोष्टीक खाऊ तसेच आरोग्य विषयक लागणा-या सोई-सुविधा यासाठी करणेत यावा. याबाबी आपल्या विभागांतर्गत केल्यानंतर या बाबतचा चांगल्या प्रकारचा संदेश समाजांमध्ये जाईल. तरी सर्व विभागप्रमुख यांनी आपले अधिनस्त जिल्हा परिषद प्रा.शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, पशुवैदयकीय दवाखाने, यांना याबाबत आपले स्तरावरुन आदेश देणेत यावे. ग्रामविकास अधिकारी/ग्रामसेवक यांनी याबाबतची योग्य ती नोंद घेवुन ग्रामपंचायत स्तरावर याबाबीचे प्रबोधन
करणेत यावे.
चौकट
गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी महाआवास घरकुल योजना प्रभावी राबवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याच्या प्रभावी कामकाजामुळे सांडपाणी व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी त्यांची निवड करण्यात आली आहे तसेच रोजगार हमी योजनेतून लखपती योजना प्रभावीपणे राबवलेली आहे. तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी स्काँलरशिप व नवोदय परीक्षेचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.