गरीबांची भाकरी श्रीमंतांच्या ताटात!!! ज्वारीच्या भाकरीची किंमत गव्हाच्या पोळीपेक्षा महाग

0
219

जामखेड न्युज——

गरीबांची भाकरी श्रीमंतांच्या ताटात!!!

ज्वारीच्या भाकरीची किंमत गव्हाच्या पोळीपेक्षा महाग

गरिबांसाठी असलेली भाकरी आज त्यांच्या ताटातून गायब झाली असून, ती भोजनालय व हॉटेलांमध्ये सर्वसामान्यांसह श्रीमंतांच्या ताटात येवून त्यांची क्षुधाशांती करत आहे. दरम्यानच्या काळात गरीब व श्रीमंत दोघांच्याही ताटातून गायब झालेल्या भाकरीला पुन्हा मागणी वाढू लागल्याने जुने ते सोने म्हणण्याची वेळ आली आहे.

एकेकाळी गोरगरीब जनतेला गव्हाची पोळी फक्त सण समारंभ किंवा जवळचे पाहुणे आले तर खाण्यासाठी मिळत होती. आता मात्र बहुतेक लोकांना गव्हाची पोळी नको नको झाली आहे व ज्वारीची भाकरी हवी हवी झाली आहे त्यामुळे गव्हापेक्षा ज्वारी महाग झाली आहे. गहू खाणारे श्रीमंत तर ज्वारी खाणारे गरीब असा समज होता. तो आता मोडित निघाला आहे.

मागील अनेक वर्षांपासून ज्वारीचे पीक हद्दपार झाल्याने भल्याभल्यांच्या जीभेला पाणी सुटणाऱ्या हुरड्यालाही अनेकांना मुकावे लागत आहे. पूर्वी घराघरात दिसणारा हुरडा आता डोळ्यांनीही दिसेनासा झाला आहे, तर गरिबाची म्हणून ओळखली जाणारी त्यांच्या ताटात दिमाखात मिरवणारी भाकरी कालौघांत गरिबांच्याही ताटातून बाद झाली आहे. ती आता थेट हॉटेल, भोजनालयांमधील ताटात मागणीनुसार दिसू लागली आहे. सर्वसाधारण ज्वारीचे दर ४० ते ५० रुपयांच्यावर गेल्याने गव्हापेक्षा ज्वारीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी दिसणारी गरीबाच्या ताटातील ज्वारीची भाकर श्रीमंताच्या ताटात जावून बसताना हॉटेलमधील मेनू कार्डवरही विराजमान झाली आहे. आता सोयाबीन उडीद पीक निघाल्यावर रब्बी हंगामात हरभरा व गव्हाचा पेरा वाढू लागला.

त्यामुळेच आपसूकच जिल्ह्यातून ज्वारीचे पीक हद्दपार झाले. वास्तविक पाहता ज्वारीला जास्त पाण्याची गरज नसते, परंतु वन्य प्राण्यांचा त्रास तसेच काढणीचा जादा खर्च होत असल्याने शेतकऱ्यांनी ज्वारीच्या पेरणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात कमालीची घट झाली. ज्वारीच्या कमतरतेमुळे एकीकडे ताटातील भाकर हरवली, तर दुसरीकडे जनावरांसाठी वैरण म्हणून वापरात येणारा कडबा देखील नामशेष झाला आहे. आता बाजारपेठेत उत्तम प्रतीच्या बेद्री, जुट ज्वारीचे भाव ४५ ते ५५ रुपये प्रती किलोच्या वर गेले आहे. त्यामुळे गव्हाच्या पोळीपेक्षा ज्वारीची भाकर हॉटेलमध्ये महाग झाली आहे.

पाेळीपेक्षा भाकरी महाग

पूर्वी गावराण ज्वारी शेतात दिमाखात डोलत असायची. त्यानंतर संकरित ज्वारीने त्याची जागा घेतली. नंतरच्या काळात शेतकरी, गहू, सोयाबीन, सूर्यफूल व कपाशीच्या उत्पादनाकडे वळले, परतु आता पिकच हद्दपार झाल्याने ज्वारीच्या भाकरीची किंमत गव्हाच्या पोळीपेक्षा महाग झाली असल्याचे पहायला मिळत आहे.

 

हुरडा पार्ट्याही कमी

शेतामध्ये हुरडा पार्टी आयोजित करून अनेक जण त्याचा आनंद घेत होते. आपल्या माणसांना प्रेमाने बांधून ठेवणारी ही हुरडा संस्कृती आता नामशेष होत असून, ती केवळ मोजक्याच फार्महाऊससारख्या ठिकाणी पहायला मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here