जामखेड न्युज——
सात दिवसात अतिक्रमणे काढा राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून आदेश
चारच दिवसांपूर्वी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला होता इशारा
जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्याची शासकीय हद्द हि रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस प्रत्येकी १५ मीटर (५० फुट) अंतरापर्यंत आहे. रस्ताच्या शासकीय हद्दीमध्ये असणारे नियमबाह्य अनधिकृत बांधकाम हे प्रस्तावित राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळा ठरत असल्याने अतिक्रमण धारकांनी सदरचे अतिक्रमण ७ दिवसात (दि.७ मार्च २०२३ पर्यंत) काढून घ्यावीत असा विनंतीवजा आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने काढण्यात आला असून तसा सूचना फलकच जामखेड शहरातून जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला लावण्यात आला आहे.
जामखेड शहरातून जाणाऱ्या जामखेड ते सौताडा या राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८ डी या रस्त्याच्या कामाची जामखेड शहरातून सुरूवात झाली आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या अतिक्रमणामुळे हे काम करण्यात अडथळे येत आसल्याच्या पार्श्वभूमीवर हा फलक लावण्यात आला आहे.
कोणाचेही अतिक्रमण असू द्या. सगळे अतिक्रमणे जमीनदोस्त करणार असा इशारा खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी नुकताच भुमिपुजन प्रसंगी दिला होता.
जामखेड शहरातून जाणाऱ्या चार पदरी काँक्रीट रस्ता मंजूर करून १५० कोटी रुपयांचे काम मंजूर करून आणले असून डिव्हाडर,मध्ये स्टेट लाईट, फुटपाथ असा सुंदर रस्त्या एक वर्षात पूर्ण करून कोणाचेही अतिक्रमण असू द्या काढणारच आहे, मतदान नाही केले तरी चालेल पण जामखेडच्या विकासात आडवा येणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी आमची असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले.
जामखेड शहरातून जाणाऱ्या नगर-बीड रोडची गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून ३ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी १ तासाचा वेळ लागत आहे हि बाब लक्षात घेऊन खासदार डॉ सुजय विखे याच्या विशेष प्रयत्नातून १५० कोटी रुपयांच्या जामखेड ते सौताडा महामार्गाचे भूमिपूजन खासदार डॉ सुजय विखे,आमदार राम शिंदे यांच्या उपथितीत पार पडले. होते यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी निर्वाणीचा इशारा दिला होता. यानुसार राष्ट्रीय महामार्ग कामाला लागले आहे.