जामखेड न्युज—-
लोकवर्गणीतून शाळेचा विकास कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे धामणगावकर-केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते.
शिक्षणाचे महत्त्व पालकांना समजावून देत विद्यार्थ्यांसाठी भौतिक सुविधा वर्ग खोल्या किती महत्त्वाच्या आहेत हे सांगत ग्रामस्थांकडून लाखो रुपयांची लोकवर्गणी जमा झाली.लोकवर्गणीतून शाळेचा विकास कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे धामणगावकर आहेत असे केंद्रप्रमुख मुकुंदराज सातपुते यांनी सांगितले.
दिनांक-28/12/2022 वार-बुधवार रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणगाव, ता.जामखेड या ठिकाणी सकाळी 09:00 वाजता धामणगावचे सरपंच सन्माननीय महारुद्र महारनवर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिगंबर महारनवर सोसायटीचे चेअरमन बापूराव घुमरे, धामणगावचे उपसरपंच गणेश थोरात, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालकवर्ग व तेलंगशी केंद्राचे केंद्रप्रमुख सन्माननीय मुकुंदराज सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
सदर मेळाव्यामध्ये जामखेड तालुक्याचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी प्रकाशजी पोळ, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली तेलंगशी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.मुकुंदराज सातपुते साहेब, शाळेचे मुख्याध्यापक रुपेश वाणी तसेच सर्व शिक्षकवृंद यांच्यावतीने शाळेच्या वर्गखोल्यांचे निर्लेखन झाल्याकारणाने विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता वर्गखोल्यांची नितांत आवश्यकता असल्याने जिल्हा परिषद अहमदनगर महत्त्वकांक्षी योजना मिशन आपुलकी अंतर्गत लोकवर्गणीचे आवाहन करण्यात आले.
यावेळी आव्हानाला प्रतिसाद देत व आपल्या पाल्यांच्या भावी शिक्षणाचे महत्त्व जाणून धामणगावचे सरपंच सन्माननीय महारुद्र महारनवर यांनी रू.11,111/-, सोसायटीचे चेअरमन श्री.बापुराव घुमरे यांनी रू.11,111/-, शा. व्य. स. अध्यक्ष श्री.दिगंबर महारनवर यांनी रू.7000/-, धामणगावचे उपसरपंच श्री.गणेश थोरात यांनी रू.5000/-,धामणगाव ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्य प्रत्येकी रू.5000/- तसेच शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांनी रू.21,000/- रोख रक्कम देऊन वर्गणीस सुरुवात केली पाहता-पाहता शेवटी सर्व मान्यवर,ग्रामस्थ व पालकवर्ग यांच्याकडून एकूण रु.2,00,000/- ते 2,50,000/- रोख रक्कम लोकवर्गणीच्या माध्यमातून जमा झाली. ज्या मान्यवरांनी,पालक व ग्रामस्थांनी रोख रक्कम जमा केली अशा मान्यवरांचे शाळेच्यावतीने तेलंगशी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.मुकुंदराज सातपुते शाळेचे मुख्याध्यापक श्री.रूपेश वाणी व सर्व शिक्षकवृंद श्री.किसन वराट , श्री.नारायण लहाने , श्री.चंद्रकांत पांडुळे, श्रीमती स्वाती गोरे , श्री.एकनाथ गायकवाड , श्री.अर्जुन होले ,श्री.गणेश काटे यांच्यामार्फत सत्कार करून आभार व्यक्त केले. यावेळी पालकवर्गाचे अडीअडचणी-समस्या जाणून घेत शाळेची विद्यार्थी उपस्थिती 100% राहण्यासाठी सकारात्मक चर्चा करण्यात येऊन 26 जानेवारी 2023 प्रजासत्ताक दिनानिमित्त सायंकाळी 07:00 ते 10:30 यावेळेत शाळेमार्फत विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थी सहल आयोजनाबाबतचे योग्य ते नियोजन करण्यात आले.
तेलंगशी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.मुकुंदराज सातपुते साहेब यांनी उपस्थित ग्रामस्थ व पालकांना विद्यार्थ्यांकरिता शासनाच्या असणाऱ्या विविध योजना तसेच विद्यार्थी शिष्यवृत्यांबाबत सविस्तर व सखोल असे मार्गदर्शन करून लोकवर्गणीच्या माध्यमातून शाळेचा विकास कसा करावा याचे उत्तम उदाहरण धामणगावकरांनी निर्माण केले असे प्रतिपादन केले शेवटी सर्व शिक्षकांना योग्य त्या सूचना केल्या.
शेवटी शाळेचे उपाध्यापक श्री.गणेश काटे सर यांनी शाळेस वर्गणी देऊन सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे व उपस्थित मान्यवरांचे आभार मानून पालक मेळाव्याचे समारोप केले.