जामखेड न्युज——
शंभर टक्के घरकुल पुर्ण करणारा जामखेड तालुका राज्यात पहिला येईल – आशिष येरेकर
ग्रामसेवक व गटविकास अधिकारी यांनी उत्कृष्ट कामगिरी मुळे अमृत महाआवास योजनेत जामखेड पंचायत समिती राज्यात आदर्श ठरेल
100% घरकुल पूर्ण करणारा जामखेड राज्यातील पहिला तालुका ठरावा- आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अहमदनगर
100% घरकुल मंजुरी व 100% घरकुल पूर्ण करणारा जामखेड हा राज्यातील पहिला तालुका ठरावा अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केली. पंचायत समिती जामखेडच्या सर्व अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, जामखेड पंचायत समितीच्या अधिकारी व ग्रामसेवकांनी मागील काही दिवसात उत्कृष्ट काम केले आहे. यापुढे याच जोमाने काम केल्यास अमृत महाआवास अभियानात जामखेड पंचायत समितीला पुरस्कार मिळेल.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे,सहायक गटविकास अधिकारी दया पवार, CDPO ज्योती बेल्हेकर, उपअभियंता विठ्ठल माने, शाखा अभियंता श्री साळवे तसेच सर्व अधिकारी व ग्रामसेवक उपस्थित होते.
जामखेड तालुक्याला 2021-22 या वर्षासाठी प्रधानमंत्री आवास योजनेचे सन 2215 व रमाई आवास योजनेचे 440 उद्दिष्ट प्राप्त आहे. यापैकी प्रधानमंत्री आवास योजनेचे 2184 लाभार्थी मंजूर करून जामखेड पंचायत समिती लाभार्थी मंजुरीच्या बाबतीत नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच रमाई आवास योजनेचे 414 लाभार्थी मंजूर करण्यात आले आहेत. मागील एक महिन्यापासून गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घरकुल पूर्ण करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गट करून गावोगावी घरकुल भेटी सुरू आहेत. घरकुल लाभार्थ्यांना वेळेत अनुदान दिले जात आहे. त्यामुळे लाभार्थ्यांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. यावेळी श्री. येरेकर यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामसेवकांचा व घरकुल कक्षातील कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.