जामखेड न्युज——
विविध विकास कामांच्या स्थगिती बरोबरच एसआरपी प्रशिक्षण केंद्रही चालले दुसरीकडे
दुसरीकडे गेलेले ‘एसआरपी प्रशिक्षण केंद्र रोहित पवारांनी ’पुन्हा मतदारसंघात खेचून आणले; पण प्रगतीपथावर असलेले काम आता भाजप नेते स्थलांतरित करत आहे
मनुष्यबळाची भरती प्रक्रिया झाली असताना आणि पूर्णत्वास येत असलेल्या कामाला पुन्हा दुसरीकडे हलवण्यासाठी भाजपचा अट्टाहास का?
कर्जत-जामखेड मतदारसंघामध्ये एकेकाळी ‘राज्य राखीव पोलिस बल गट (SRPF) प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले होते. मात्र, कालांतराने ते जळगांव जिल्ह्यातील वरणगाव येथे हलविण्यात आले. रोहित पवार आमदार होताच त्यांनी पाठपुरावा करुन कर्जत-जामखेड मतदारसंघातून हलविण्यात आलेले ‘राज्य राखीव पोलिस बल गट (एसआरपीएफ) प्रशिक्षण केंद्र’ महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुन्हा मतदारसंघात खेचून आणले. व त्या कामासाठी आवश्यक बांधकाम करण्यासाठीची ३४ कोटी ३७ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन २२ जून २०२२ रोजी याबाबतचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आणि आता मंजूर काम हे प्रगतीपथावर असताना आता भाजपकडून पुन्हा हे प्रशिक्षण केंद्र हलवण्याचा व कर्जत जामखेडमधील जनतेवर अन्याय करण्याचा घाट घातला जात आहे जे अत्यंत दुर्दैवी आहे. विशेष म्हणजे कुसडगाव राज्य राखीव पोलीस बलासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची भरती प्रक्रिया येथील पूर्ण झाली असून त्यात निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींचे सध्या प्रशिक्षण देखील सुरू आहे.
जामखेड तालुक्यातील कुसडगांव येथे मंजूर झालेले एस.आर.पी.एफ.चे प्रशिक्षण केंद्र युती सरकारच्या व त्यावेळचे आमदार आणि मंत्री राहिलेले राम शिंदे यांच्या कार्यकाळात जळगाव जिल्ह्यात हलविण्यात आले होते. मतदारसंघात मंजूर झालेले असूनही एसआरपीएफ प्रशिक्षण केंद्र हे जळगांव (वरणगाव) जिल्ह्यात जाऊनही तत्कालिन लोकप्रतिनिधी हे मंत्री असूनही त्यांना ते थांबवता आले नव्हते. शिवाय तत्कालिन लोकप्रतिनिधींनी ना हे केंद्र मंजूर होण्यासाठी पत्रव्यवहार केला होता ना ते केंद्र परत आणण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, हा कर्जत-जामखेड मतदारसंघावरील अन्याय ओळखून आमदार रोहित पवार यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्यानुसार योग्य ती कार्यवाही होऊन २६ जून २०२० रोजी हे केंद्र कुसडगांव (ता. जामखेड) येथे आणण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आणि जून २०२२ मध्ये कार्यारंभ आदेश देऊन कामाला सुरुवातही झाली ते काम प्रगतीपथावर असताना आता भाजप सत्तेत आल्यानंतर भुसावळच्या भाजपच्या एका आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वरणगाव येथे प्रशिक्षण केंद्र होण्याबाबत पत्राद्वारे विनंती केली आणि फडणवीसांनीही पुन्हा ते प्रशिक्षण केंद्र वरणगाव येथे करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार गृह विभागाच्या पत्रव्यवहारातून कुसडगाव येथे सुरू असलेल्या कामाच्या स्थितीची, निधी वितरणाची व इतर माहिती मागवण्यात आली आहे.
परंतु, राम शिंदे आमदार झाल्यानंतर आणि भाजप सत्तेत आल्यानंतरच कर्जत-जामखेड मतदारसंघातील कामे रोखून येथील जनतेवर अन्याय होत असेल तर ही अत्यंत खेदजनक व अन्यायकारक बाब आहे. फक्त राजकीय स्वार्थापोटी राज्यातील विविध कामांना स्थगिती देण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता ७० टक्के काम पूर्ण झालेल्या व कोट्यवधींचा शासकीय निधी खर्च झालेल्या कुसडगाव येथील प्रशिक्षण केंद्राला हलवण्याचा तांत्रिकदृष्ट्या योग्य नसलेला घाट भाजपकडून घातला जात आहे. परंतु आता हे काम पूर्णत्वास आलेले केंद्र दुसरीकडे नेण्यापेक्षा केंद्रीय सुरक्षा बल, भारतीय सुरक्षा बल असे प्रशिक्षण केंद्र देखील राज्यात मंजूर आहेत, म्हणून हा पर्याय देखील राज्यासमोर उपलब्ध होता. परंतु फक्त द्वेषाचं / सुडाचं राजकारण करायचं म्हणून असा प्रयत्न केला जातोय हे अत्यंत दुर्दैवी आहे.
चौकट (प्रतिक्रिया)
तांत्रिकदृष्ट्या हे पोलीस प्रशिक्षण केंद्र दुसरीकडे जाणं शक्य नाही आणि दबाव आणून जर कोणी नेण्याचा प्रयत्न केला तर ते देखील आम्ही होऊ देणार नाही. पण अशा पद्धतीने एखादी गोष्ट मतदारसंघात आली असेल आणि विरोधी आमदाराला त्याचं श्रेय जाऊ नये म्हणून भाजपची लोकं अशा प्रकारचे काम रद्द करणार असतील तर हे विकासाच्या विरोधात आहे.
आमदार रोहित पवार