सर्जरी सुरू असताना बत्ती गुल मोबाईलचा टॉर्च लावून मंत्री भुमरेंच्या दातांची सर्जरी

0
197

जामखेड न्युज——

रुग्णालयातील लाईट गेल्याने मोबाईलचा टॉर्च लावून मंत्री भुमरेंच्या दातांची सर्जरी

 

राज्याचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे आणि औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरु असताना लाईट गेल्याचा प्रकार समोर आला आहे.

भुमरे यांच्या दातांवर उपचार सुरु असतानाच अचानक वीज गेली. त्यामुळे आता उपचार कसा करावा असा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. अखेर मोबाईल उजेडात भुमरे (Sandipanrao Bhumre) यांच्या दातांवर उपचार करण्यात आले. औरंगाबादच्या शासकीय दंत रुग्णालयात जनरेटही उपलब्ध नव्हता. त्यामुळे सर्वांचीच भंबेरी उडाली. उपचार सुरु असताना कक्षात अंधार पडल्याने पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी संताप व्यक्त केला.

संदीपान भुमरे यांनी रविवारी औरंगाबाद येथील शासकीय कार्यालयांना भेट देत आढावा घेतला. यावेळी त्यांनी शासकीय दंत महाविद्यालयालाही (Aurangabad dental college) भेट दिली. यावेळी डॉक्टरांशी बोलत असताना संदीपान भुमरे यांनी आपल्या दाताच्या समस्येबद्दल सांगितले. तेव्हा उपस्थित डॉक्टरांनी संदीपान भुमरे यांच्यावर लगेच उपचार करण्याची तयारी दाखवली. मग भुमरे यांनीही दौऱ्यातून वेळ काढून दाताच्या दुखण्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी संदीपान भुमरे यांच्या दातांचा एक्सरे काढून त्यांच्या दाताचं रुट कॅनॉल (root canal surgery) सुरु होते. नेमकी तेव्हाच रुग्णालयातील बत्ती गुल झाली. त्यामुळे संदीपान भुमरे यांचे रुट कॅनॉल सुरु असलेल्या कक्षात अंधार पडला. त्यामुळे डॉक्टर आणि कर्मचारी वर्गाची तारांबळ उडाली. अखेर सर्वांना आपापले मोबाईल टॉर्च सुरु करुन त्याच्या प्रकाशात संदीपान भुमरे यांच्या दातांचे रुट कॅनलिंग पूर्ण केले.

 

 

 

एरवी शासकीय रुग्णालयात सामान्य नागरिकांना अशाप्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागणे, ही काही नवीन बाब नाही. औरंगाबाद शासकीय दंत महाविद्यालयाकडून गेल्या पाच वर्षांपासून जनरेटर उपलब्ध करुन देण्याची मागणी केली जात होती. मात्र, प्रशासनाने या मागणीकडे ढुंकूनही पाहिले नव्हते. परंतु, काल पालकमंत्र्यांवरच उपचार सुरु असताना लाईट गेल्याने जनरेटरची निकड प्रशासनाच्या लक्षात आली. संदीपान भुमरे यांनी ‘याचि देही याचि डोळा’ जनरेटरमुळे होणारी अडचण पाहिली. त्यामुळे भुमरे यांनी जागच्या जागी औरंगाबाद शासकीय दंत महाविद्यालयाच्या जनरेटरसह इतर मागण्यांना मंजुरी दिली.नवीन जनरेटर येईपर्यंत कोविड केअर सेंटरमधील जनरेटर आणावे असेही निर्देश भुमरे यांनी यावेळी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here