श्रीनागेश्वर पालखी सोहळ्यानिमित्त शुक्रवारपासून जामखेडला नामसाप्ताहास प्रारंभ

0
211

जामखेड न्युज——

जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वर यात्रेनिमित्त शुक्रवारपासून दि.२९ येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे . या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला श्रीनागेश्वर पालखी सोहळा मंगळवार ( दि.२ ऑगस्ट )होईल. श्री नागेश्वर मंदिराच्या स्थापनेला यावर्षी आठशे वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच कोरोना काळात मागील दोन वर्ष येथे कोणताही सार्वजनिक मोठा उत्सव पार पडला नाही त्यामुळे यावर्षीच्या उत्सवासाठी भक्तांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. 

जामखेड -खर्डा रस्त्यावर वैतरणा नदीतीरावर श्रीनागेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. शके११४४ मध्ये या मंदिराचे बांधकाम झाले असल्याचा उल्लेख येथे आहे. शके ११४४ ते सध्याचे शके १९४४ असा आठशे वर्षांचा इतिहास सांगणारे हे प्राचीन मंदिर आजही सुस्थितीत उभे आहे.

 

त्या काळातील शास्त्रयुक्तपद्धतीने केलेले दगडी काम आजही सुस्थितीत आहे. उत्तराभिमुख असलेल्या मंदिरातील गाभाऱ्यात काळी पाषाणाची पिंड आहे. पिंडीवर भगवान शंकराचा मुखवटा व नागाचा फडा आहे. समोर नंदी व पितळी भव्य त्रिशूळ आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला औदुंबर व उजव्या बाजूला पुरातन काळातील काही साधूंच्या समाधी आहेत.

 

श्रावण शुद्ध पंचमीला या ग्रामदेवतेची यात्रा असते.
उत्सवाच्या निमित्ताने येथे २९ जुलै पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज सायंकाळी ७ ते ९ वा. कीर्तन व नंतर आलेल्या सर्व भक्तांना भोजन असा भव्य कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शुक्रवारी दि. २९ विजय महाराज बागडे, गुरुवार दि. ३० ज्ञानेश्वर महाराज माऊली करंदीकर ३१ जुलैला सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक ज्ञानेश्वर महाराज कदम, १ ऑगस्टला सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक परमेश्वर महाराज जायभाये, २ ऑगस्टला दत्ता महाराज अंबीरकर, दिनांक 3 ऑगस्ट रोजी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज बोधले, ४ ऑगस्टला रघुनाथ महाराज चौधरी धामणगावकर यांचे कीर्तन होईल.

शुक्रवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत विठ्ठल महाराज यांचे काल्याचे कीर्तन होईल. व शेवटी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.

यामुळे चाळासाठी प्रसिद्ध असलेली जामखेडची यात्रा टाळासाठी प्रसिद्ध होत आहे. 

पालखी सोहळा

मंगळवार दी. २ ऑगस्ट रोजी सकाळी श्रीनागेश्वराची विधिवत पूजा होईल. नंतर पालखीमध्ये श्रीनागेश्वराचा मुखवटा ठेऊन ही पालखी रथात ठेवली जाईल. टाळ मृदुंगाच्या गजरात हरहर महादेवाच्या जयघोषात मिरवणुकीस सुरुवात होईल. खर्डा रस्त्याच्या श्री नागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, विठठल मंदिर,छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, कचेरी रोड, महादेव गल्लीमार्गे ही दिंडी नव्याने तयार झालेल्या वैतरणा नदीतील रस्त्याने श्री नागेश्वर मंदिरापर्यंत पोहोचेल नंतर आरती व महाप्रसाद होईल. दरम्यान, दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी मंदिरासमोर होमहवन करतील.

उत्सव समितीच्या वतीने भगवान नागेश्वराला कार्यक्रम पत्रिका आर्पण करून संकल्प सोडण्यात आला. यावेळी श्री नागेश्वर सेवा मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब खराडे, दीपक महाराज गायकवाड, दिलीपकुमार राजगुरू ,शंकर राऊत ,सीताराम राळेभात,विजय गदादे,प्रवीण राऊत, विनायक राऊत, नारायण राउत,आनंद राजगुरू सचिन वराट, महादेव पानसांडे, उपस्थित होते.

पालखी साठी राजू फिटर यांनी स्वखर्चाने केला पक्का रस्ता

पूर्वी श्री नागेश्वर मंदिराकडे जाणारा एकही रस्ता नव्हता जामखेड हुन खार्ड्याकडे जाताना जेथे सारोळा रस्ता सुरू होतो तेथून श्री नागेश्वर मंदिरापर्यंत एका बांधावरून पाऊल वाट होती. तिथून साधी सायकलही नेता येत नव्हती. नंतर योगायोगाने २००४ च्या दरम्यान शेजारी स्व. नागनाथ गिरमे यांचे प्लॉटिंग पडल्यामुळे रस्ता झाला. त्या कच्च्या रस्त्याला सहा सात वर्षांपूर्वी येथील उद्योजक राजेंद्र जाधव उर्फ राजू फिटर यांनी स्वखर्चातून पक्का सिमेंट काँक्रीट चा रस्ता भक्तांसाठी करून दिला. याच रस्त्यावर मंडळाने लोकवर्गणीतून भव्य प्रवेशद्वार उभे केले. आणि हाच रस्ता पालखी मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला. सध्या त्या रस्त्याची दुरस्त झाली होती यात्राजवळ आल्याने राजू फिटर यांनी पुन्हा तोच रस्ता स्वखर्चाने करून दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here