शिंदे सरकारचा रोहित पवारांना झटका, कर्जतमध्ये आणलेल्या कामाला स्थगिती

0
265
जामखेड न्युज——
 राज्यात मागील काही दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे सरकार सत्तेत आले. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा सपाटा सुरू केला आहे. आता या स्थगितीच्या निर्णयांचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना बसला आहे.
राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी कर्जतमध्ये आणलेल्या विकासकामांना शिंदे सरकारने स्थिगती लावल्याने फटका बसला आहे. मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कर्जत येथील दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्याच्या प्रश्नात आमदार रोहित पवार यांनी लक्ष घालून आणि पाठपुरावा करून मंजुरी मिळवली होती. त्यामुळे कर्जत-जामखेडकरांचा मोठा प्रश्न मार्गी लागला होता.
दरम्यान, राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर सरकारला असे निर्णय घेता येत नाहीत, अशी भूमिका घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयांना आक्षेप घेतला होता. त्यानुसार गुरुवारी मंत्रिमंडळ बैठकीत या सर्व निर्णयांना स्थगिती देण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे या निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत. त्यामुळे कर्जतच्या दिवाणी न्यायालयाचा (वरिष्ठ स्तर) प्रश्न पुन्हा रेंगाळणार की फेरआढाव्यात त्याला मंजुरी मिळणार, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.हिंगोली जिल्ह्यात बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे, कर्जत (जि. अहमदनगर) येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करणे, अहमदनगर-बीड-परळी वैजनाथ या नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सुधारित खर्चास मान्यता, ग्रामीण भागातील विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल योजना राबविणे, विदर्भ विकास मंडळ, असे अनेक लोकप्रिय निर्णय बैठकीत घेतले होते.
कर्जत येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यास आणि त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत अंतिम मंजुरी देण्यात आली होती. त्याला आणि औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्थगिती दिली आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. याशिवाय आज औरंगाबादचं नामकरण करताना मुख्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीराजे करावं अशी घोषणा केली आहे. तर उस्मानाबादचे धाराशिव अशी घोषणा परत केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here