जामखेड न्युज – – –
जालना शहरातील पाणी प्रश्नावर आज भाजपतर्फे विराट मोर्चा काढण्यात आला. खुद्द देवेंद्र फडणवीस औरंगाबादच्या मोर्चाप्रमाणेच इथेही जालनेकरांच्या जलाक्रोशाचं नेतृत्व करताना दिसले. जालन्याचेच मंत्री रावसाहेब दानवेंची (Raosaheb Danve) जय्यत तयारी. मात्र औरंगाबादप्रमाणेच जालन्यातही पंकजा मुंडे (Pankaja Munde) गैरहजर आहेत. विधानपरिषदेतील उमेदवारी नाकारण्यात आल्यानंतर पंकजा मुंडे नाराज आहेत. महाराष्ट्रातील अनेक कार्यक्रम आणि मोर्चांमधूनही त्यांना डावलण्यात आल्याचं चित्र आहे. मुंबईतल्या ओबीसी आरक्षणासाठीच्या (OBC reservation) मोर्चापासून औरंगाबाद, जालन्यातील मोर्चातही पंकजांचं अस्तित्व कुठेही दिसून आलं नाही. खुद्द पंकजा मुंडेंनी याबाबत नाराजी व्यक्त केली नसली तरीही त्यांच्या समर्थकांमधून ही अस्वस्थता अधिक तीव्रतेने उफाळून येत आहे. मराठवाड्यात पंकजा समर्थकांनी ठिकठिकाणी भाजप श्रेष्ठींपर्यंत आपली नाराजीही पोहोचवली. पण पंकजा मुंडे यांचं मात्र मौन आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत त्यांना स्थान देण्यात आलंय. मध्य प्रदेश सरकारच्या त्या प्रभारी आहेत. तिथे सक्रिय असल्यामुळे मराठवाड्याकडे त्यांचं दुर्लक्ष होतंय की, भाजपअंतर्गत कुरघोडींमुळे त्यांना नमतं घेत इकडे दुरावा साधावा लागतोय, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. एकूणच आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर प्रचंड जनाधार असलेल्या पंकजा मुंडेंची मराठवाड्यातील गैरहजेरी राजकीय वर्तुळाला विचार करायला भाग पाडणारी आहे.
औरंगाबादनंतर जालन्याच्या मोर्चात पंकजा गैरहजर
मागील महिन्यात औरंगाबादच्या पाणी प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनीच विराट मोर्चा काढला. यावेळी त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंनी पूर्वी केलेल्या पाणी आंदोलनाची आठवणही करून दिली. पण पंकजांचा उल्लेख टाळला. औरंगाबादच्या आणि आता जालन्याच्या मोर्चातही पंकजा मुंडेंना निमंत्रण मिळालं नाही. पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपचं राष्ट्रीय सचिवपद आहे. मध्य प्रदेश भाजपच्या त्या प्रभारी आहेत. पण मराठवाड्यातील एवढ्या मोठ्या इव्हेंटला बोलावलं असतं तर त्या आवर्जून आल्या असत्या. पण पंकजाताईंचं महाराष्ट्रातील सामान्यांच्या प्रश्नावर पुढे न येणं हे अनेकांना कोड्यात टाकणारं आहे.
पंकजांचं अजूनही मौन
2019 मधील विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांना राजकीय पुनर्वसनाची अपेक्षा आहे. यावेळी तरी विधानपरिषद निवडणुकीत त्यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्तच्या कार्यक्रमात त्यांनी संधी मिळाली तर त्याचं सोनं करीन, असं वक्तव्यही केलं होतं. मात्र ऐनवेळी पंकजा मुंडे यांना ही संधी नाकारण्यात आली. त्यानंतर पंकजा मुंडे समर्थकांमध्ये तीव्र नाराजी आहे. मात्र पंकजा मुंडे यांनी याविषयावर अद्याप भाष्य केलेलं नाही.
फडणवीस, चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
पंकजा मुंडे यांना डावलण्यात आल्याच्या चर्चांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंकजा मुंडे या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे मध्य प्रदेशची जबाबदारी आहे. त्या सातत्याने तेथे जात असतात. त्या नाराज नाहीत. आम्ही सगळेच त्यांच्या संपर्कात असतो. भाजप एक परिवार आहे आणि आम्ही सर्व परिवाराचे घटकपक्ष आहोत.’ तर चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय की, राजकारणात कधीही फुलस्टॉप नसतो. कॉमा असतो. त्यामुळे ही संधी पुन्हा येणारच नाही, असं नाही.