पुणतांबा येथे आजपासून शेतकरी आंदोलन, विद्यार्थीही होणार सहभागी

0
203
जामखेड न्युज – – – – 
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारपासून पुणतांब्यातील शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू होत आहे. २०१७ मध्ये शेतकरी संपाला पाठिंबा देत सातबारा कोरा करण्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. आज ठाकरे मुख्यमंत्री असल्याने आंदोलनातील मागण्यांची ते कशी दखल घेतात याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पुणतांब्यातील लोकांनी राजकीय जोडे बाजूला ठेवत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. शेतकरी धरणे आंदोलन पाच दिवसांचे असले तरी सरकारने ठोस आश्वासन दिले नाही तर ५ जूननंतर या आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या आंदोलनात शेतकरी पुत्र असलेले महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होणार आहेत. राज्यभरातील शेतकरी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
शेतकऱ्यांच्या मागण्या :
उसाला प्रतिटन १ हजार रुपयांचे अनुदान द्यावे, गाळप न झालेल्या उसाला एकरी २ लाख नुकसान भरपाई द्यावी, कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये अनुदान द्यावे, शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण दाबाने वीज द्यावी, शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल माफ करावे, कांदा आणि गव्हाची निर्यात बंदी उठवावी, सर्व शेतमालाला आधारभूत भाव द्यावा, कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सवलत द्यावी, दुधाला एफआरपी लागू करत ४० रुपये भाव द्यावा, दूध संकलन सेंटरमधील शेतकऱ्यांची लूट थांबवावी, वन्य प्राण्यामुळे होणारी भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यापूर्वी शेतकरी आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे, वन हक्क कायद्यानुसार आदिवासींना जमिनी नावावर करून द्याव्यात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here