Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या रायगडावरील शिवरायांची समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही – संभाजीराजे छत्रपती

रायगडावरील शिवरायांची समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही – संभाजीराजे छत्रपती

0
292
जामखेड न्युज – – – 
 “इतिहास पूर्णपणे माहित असेल तरच बोलावं नाही तर अशा विषयांना हात लावू नये,” अशा शब्दात संभाजीराजे छत्रपती यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला. “छत्रपतींचा वंशज या नात्याने मी अधिकृत सांगू इच्छितो की शिवरायांची ती समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही,” असंही संभाजीराजे यांनी स्पष्ट केलं. ते दिल्लीत बोलत होते.
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी लोकमान्य टिळक यांनी बांधली असा दावा राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील जाहीर सभेत केला होता. यानंतर यावरुन बरीच चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेडसह इतिहासकारांनी राज ठाकरे यांचा दावा खोडून काढत तो चुकीचा असल्याचं म्हटलं.
‘इतिहास पूर्णपणे माहित असेल तरच बोलावं नाही तर अशा विषयांना हात लावू नये’
याविषयी संभाजीराजे म्हणाले की, “राज ठाकरे यांचं वक्तव्य इतिहासाला धरुन नाही हे स्पष्ट सांगतो. राज ठाकरे यांनी या विषयाचा नीट अभ्यास करावा. एखाद्या जबाबदार नेत्याने असं वक्तव्य करणं चुकीचं आहे. इतिहास पूर्णपणे 100 टक्के माहित असेल तरच बोलावं नाही तर अशा विषयांना हात लावू नये. मला तुम्ही इतिहास विचारलात तर तर मी अधिकृत सांगू इच्छितो की, शिवरायांची ती समाधी लोकमान्य टिळक यांच्याकडून बांधली गेली नाही.”
“हे श्रेय सगळ्या लोकांचं आहे. महात्मा फुलेंनी ही समाधी दिसली 1925 मध्ये ती बांधली. पण याचं संपूर्ण श्रेय हे शिवभक्तांचं आहे, वैयक्तिक श्रेय कोणाचंही नाही,” असंही संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं.
पुढे काय करणार लवकरच जाहीर करणार : संभाजीराजे
दरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती आज राजधानी दिल्लीत आहेत. त्यांच्या राज्यसभेचा कार्यकाळ आज संपत आहे. संभाजीराजे पुढे काय करणार हे लवकरच जाहीर करणार आहे. कोल्हापुरात 6 मे रोजी शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दीचा कार्यक्रम आहे. त्यानंतर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं. “पुढे काय करायचं हे माझ्या डोक्यात ठरलेलं आहे, फक्त ते जाहीर नंतर करणार,” असं त्यांनी सांगितलं.
राजकारणात उतरायचं हे आता निश्चित : संभाजीराजे
दिल्लीचे राजकारण करणार की महाराष्ट्राचे राजकारण या प्रश्नावर संभाजीराजे म्हणाले की, “दोन्ही मला आवडतं. राजकारणात आता उतरायचंय हे आता निश्चित आहे. मग दिल्ली असो किंवा महाराष्ट्र असो, दोन्हीत मी रमतो. दोन्हीकडे माझे संपर्क वाढलेले आहेत. महाराष्ट्र माझ्याकडे बघतो की शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकरांचे विचार घेऊन दिल्लीत जायला पाहिजे. तर दिल्लीतल्या लोकांची इच्छा आहे शिवाजी महाराज, शाहूंचा वंशज इथे आला आहे, इथे त्याची ताकद वाढायला हवीय. दोन्ही अँगल आहेत. दिल्ली आणि महाराष्ट्र या दोन्हीच्या माध्यमातून मी राजकारणात सक्रिय होणार आहे.
भूमिका ठरवण्याआधी गुजरातला जातोय कारण…
संभाजीराजे गुजरात दौरा करणार आहेत. भूमिका ठरवण्याआधी गुजरातमध्ये जात आहे त्याचं कारण काय, “या प्रश्नावर संभाजीराजे म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज राजकोटला शिकले होते. मी तिथला माजी विद्यार्थी आहे. तिथल्या शाळेला अभिवादन करण्यासाठी तिथल्या लोकांनी मला बोलावलं आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!