जामखेड न्युज – – – – –
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याच्या मागणीमुळे ते चांगलेच संकटात सापडले आहेत. हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत त्यांना दिलासा मिळण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. आता त्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार असं दिसतंय. न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याच्या खारमधल्या घरावर मुंबई महानगरपालिकेने नोटीस जारी केली आहे. घराचं बांधकाम अनधिकृत असल्याच्या तक्रारीनंतर महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे.
राणा दाम्पत्याने मातोश्री या मुख्यमंत्री ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्या अनुषंगाने राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत होत्या. अखेर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली होती.
हेही वाचा: ब्रेकिंग! राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच; बुधवारी होणार सुनावणी
२३ एप्रिलपासून तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली असून निकालपत्राचं काम झालेलं नसल्याने त्यांना उद्या म्हणजे ४ मेपर्यंत कारागृहातच मुक्काम करावा लागणार आहे.





