जामखेड न्युज – – – –
रोजचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी रात्रीच्या वेळी चांगली झोप (Sleep health) आवश्यक आहे. उत्पादकता, मूड, ऊर्जा पातळी, एकाग्रता सुधारण्यात, मानसिक आणि शारीरिक आरोग्य नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगली झोप महत्त्वाची भूमिका बजावते. उत्तम आरोग्यासाठी चांगली आणि पुरेशी झोप आवश्यक आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही.
तुम्ही कमी प्रमाणात झोप घेत असाल किंवा तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर त्याचे परिणाम गंभीर आणि दीर्घ काळ टिकणारे असू शकतात. झोपण्यापूर्वी कॅफीनचं सेवन (चहा किंवा कॉफी) आणि स्क्रीनपासून (मोबाइल, लॅपटॉप) दूर राहणं, दीर्घ श्वास घेणं, दिवसभरातल्या इतर कामांमध्ये मर्यादित वेळेतच झोप घेणं, झोपण्याची दिशा आणि स्थिती यासारख्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं आवश्यक असल्याचं आयुर्वेदात सांगितलं आहे.
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार यांनी झोपण्याच्या दिशेची आयुर्वेदानुसार माहिती देताना सांगितलं, की `उत्तरेकडं डोकं करून कधीही झोपू नये.` याशिवाय त्यांनी वेगवेगळ्या दिशेला झोपण्याचे परिणाम तपशीलवार सांगितले.
डॉ. भावसार म्हणाल्या, एखादी व्यक्ती उत्तर दिशेला (North) डोकं करून झोपत असेल, तर त्याला रात्रीच्या वेळी शांत झोप लागणार नाही आणि रात्रभर त्याच्या मनात नकळत सुरू असलेल्या द्वंद्वामुळे तो थकून उठण्याची शक्यता असते. कारण पृथ्वीच्या उत्तरेला माणसाच्या डोक्याप्रमाणेच पॉझिटिव्ह चार्ज (Positive Charge) असतो. दोन सकारात्मक चार्ज असलेले चुंबक मनात अस्वस्थता निर्माण करू शकतात. आयुर्वेदिकदृष्ट्या असं चुंबकत्व रक्ताभिसरण, ताण-तणाव आणि मनामध्ये अस्वस्थता निर्माण करतं.
तुम्ही एखाद्या गोष्टीचं शिक्षण घेत असाल किंवा तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही पूर्व (East) दिशेला डोकं करून झोपणं आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या दिशेला झोपल्यानं रक्तप्रवाह सुरळीत राहतो. याशिवाय या दिशेला झोपल्याने एकाग्रता सुधारते, ध्यानात्मक झोप लागते आणि उत्तम आरोग्य लाभतं.
… तर पडतात वाईट स्वप्नं
वास्तुशास्त्रानुसार, पश्चिम दिशा (West) ही प्रयत्नशील दिशा मानली जाते. या दिशेला झोपल्याने झोप येते; पण त्रासदायक स्वप्नंही (Dream) पडतात. तुम्हाला शांत झोपेची गरज असेल तर ती या दिशेला मिळणं केवळ अशक्य आहे.
गाढ झोपेसाठी दक्षिण दिशा आहे उत्तम
दक्षिण दिशेला (South) डोकं करून झोपल्यास गाढ झोप लागते. या दिशेला निगेटिव्ह चार्ज असतात आणि तुमचं डोकं पॉझिटिव्ह चार्ज्ड असतं. त्यामुळे तुमचं डोकं आणि दिशा यांच्यात योग्य आकर्षण निर्माण होतं. उत्तर दिशेला डोकं करून झोपल्याने शरीरातली ऊर्जा बाहेर पडत नाही. त्यामुळे आरोग्य, सुख आणि समृद्धी वाढवणाऱ्या ऊर्जेच्या दिशेने म्हणजेच दक्षिण दिशेला डोकं करून झोपावं.