Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या सोमय्या पिता-पुत्र आजही चौकशीसाठी गैरहजर

सोमय्या पिता-पुत्र आजही चौकशीसाठी गैरहजर

0
260
जामखेड न्युज – – – – 
भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना आर्थिक गुन्हे शाखेनं आज अकरा वाजता चौकशीसाठी हजर रहा, अशी नोटिस पाठवली होती. या प्रकरणात किरीट सोमय्या यांची बाजू मांडण्यासाठी त्यांचे वकील विवेकानंद गुप्ता हे पोलीस आयुक्त कार्यालयात पावणेअकराच्या सुमारास पोहोचले होते. त्यामुळे आजही किरीट सोमय्या चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. तसेच, आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. त्यावर बोलताना योग्य वेळी किरीट सोमय्या समोर येतील, असं त्यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.
किरीट सोमय्यांचे वकिल विवेकानंद गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की, 9 एप्रिलला आम्ही सांगितलं होतं की, किरीट सोमय्या बाहेर आहेत, सांगितलं होतं. किरीट सोमयाचा यांचं पाचपानी स्टेटमेंट दिलं आहे. आम्ही 13 तारखेनंतर आम्ही चौकशीला येऊ, असं आधी म्हटलं होतं. काही ट्वीट पुरावे म्हणूनही दिले आहेत. निव्वळ दोन हजारांची केस आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आहे. सरकार पोलिसांवर दबाव आणत आहेत.” तसेच, पुढे बोलताना, किरीट सोमय्या आणि नील सोमय्या इकडेच आहेत. ते कायदेशीर लढाई लढत आहेत, असं सांगितलं. तर 57 कोटींची बाब खोटी आहे, ज्यांनी आरोप केला त्यांनी सिद्ध करावं. योग्य वेळी किरीट सोमय्या समोर येतील, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. काल (मंगळवारी) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचं पथक सोमय्यांच्या मुलुंडमधल्या कार्यालयात धडकलं होतं. त्यानंतर त्यांनी समन्सची प्रत सोमय्यांच्या कार्यालयावर चिटकवली. आर्थिक गुन्हे शाखेनं किरीट आणि नील सोमय्या यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यामुळे किरीट सोमय्या आज चौकशीसाठी उपस्थित राहणार की, नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच किरीट सोमय्या यांची बाजू मांडण्यासाठी त्यांचे वकील विवेकानंद गुप्ता हे पोलीस आयुक्त कार्यालयात हजर राहिले होते.
किरीट सोमय्यांवर अटकेची टांगती तलवार; आज हायकोर्टात सुनावणी
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनासाठी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आयएनएस विक्रांत बचाव मोहिमेसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत झालेल्या कथित घोटाळा प्रकरणी सोमय्या यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत मुंबई सत्र न्यायालयानं त्यांची अटकपूर्व जामीनासाठीची याचिका सोमवारी फेटाळून लावली होती. त्या निकालाला सोमय्यांनी हायकोर्टात आव्हान दिलं आहे. न्यायमूर्ती अनूजा प्रभूदेसाई यांच्यासमोर यावर आज सुनावणी पार पडणार आहे. याप्रकरणी सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या (Neil Somaiya) यांचीही जामीन याचिका मंगळवारी फेटाळण्यात आली. मात्र त्या निकालाची प्रत संध्याकाळी उशिरनं प्राप्त झाल्यानं आज केवळ किरीट सोमय्या यांच्याच याचिकेवर हायकोर्टात (High Court) सुनावणी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, पुढील चार दिवस आलेल्या सलग सुट्यांमुळे हायकोर्टाचं नियमित कामकाज बंद राहील, त्यामुळे अटकेची टांगती तलवार रोखण्यासाठी आजची सुनावणी सोमय्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे.
काय आहे प्रकरण?
माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदारानं दिलेल्या माहितीनुसार, त्यानं दिलेली वर्गणी ही किरीट सोमय्या आणि नील सोमय्याच्या लोकांनी गोळा केली होती. याशिवाय सोशल मीडियावर चर्चगेट, दादर, भांडूप, मुलूंड अशा विविध रेल्वे स्थानकांबाहेर हा निधी गोळा करण्यात आल्याची अनेक छायाचित्र आहेत. अनेक दिवस ही वर्गणी गोळा करण्याचा कार्यक्रम सुरू होता, ज्यात स्टीलच्या एका पेटीत लोकं येताजाता पैसे टाकत होते. यातनं केवळ 11 हजारांच्या आसपास निधी गोळा झाल्याचा जर सोमय्यांचा दावा आहे, तर तो हास्यास्पद आहे. कारण तक्रारदार भोसले यांनीच त्यात दोन हजार रूपये टाकले होते, याशिवाय अन्य काही लोकांनीही हजारांमध्ये देणगी दिलीय. त्यामुळे 11 हजारांची रक्कम तर चर्चगेट स्टेशनबाहेर एका दिवसांत जमा झाले असतील. तसेच तक्रारदार हा माजी सैनिक आहे, तेव्हा त्यांच्या हेतूवर सवाल उठवणंच चुकीच ठरेल. देशावरील, सैन्यावरील प्रेमापोटी लोकांनी हा पैसा दिला होता. त्यामुळे त्याचं नेमकं काय झालं याचा तपास होणं आवश्यक आहे. हा पैसा कुणाच्या खात्यात गेला? त्यातनं काही मालमत्ता विकत घेतलीय का? याची चौकशी करण्यासाठी आरोपींच कस्टडी मिळणं आवश्यक असल्याची भूमिका मुंबई पोलिसांनी घेतली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!