जामखेड न्युज – – – –
आगामी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत. चार दिवसांपूर्वी शिवसेनेतील पक्षप्रवेशाची चांगलीच हवा झाली. त्यामुळे काकांनी पुतण्याला धक्का दिल्याचे मानले जाते. पण , आता पुतणे संदीप क्षीरसागर यांनीही काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर व माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना ‘ जशास तसे ‘ उत्तर देण्यासाठी फिल्डींग टाईट केली आहे. काकांचे नाराज मोहरे आमदार पुतण्यांनी हेरले आहेत. राजकीय बोलणी आणि वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. लवकरच आमदारांकडेही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
मागील साडेपाच वर्षांपासून बीड मतदार संघात काका विरुद्ध पुतणे राजकीय संघर्ष पेटला आहे. अलीकडे या राजकीय संघर्षाला गोळीबाराचीही झालर लागली. दरम्यान , या काका पुतणे राजकीय वादापुढे या काळात तरी तिसऱ्या राजकीय पक्ष वा नेत्याने या दोघांना तेवढी टक्कर दिल्याचे दिसत नाही. नगरपालिकांत या काका पुतण्यांतच थेट लढत झाली. त्यावेळी तिसरा पर्याय पुढे म्हणून आलेल्या एमआयएममध्येही सुरुवातीलाच उभी फूट पडली. आधे इधर आधे उधर अशी परिस्थिती पंचायत समिती . जिल्हा परिषद निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांचेच पारडे जड राहिले. तर , विधानसभेला त्यांनी थेट जयदत्त क्षीरसागर यांचाच पराभव केला.
दरम्यान , नंतरच्या काळात त्यांचे नगरपालिकेतील अनेक साथीदार त्यांच्यापासून दुरावून डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडे गेले. मागच्या काळात राजकीय आखाड्यापासून काहीसे दूर असलेले जयदत्त क्षीरसागर नगरपंचायत निवडणुका आणि अलीकडच्या शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाच्यानिमित्ताने पुन्हा आखाड्यात उतरले आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात पाच प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे ओढले. चार दिवसांपूर्वी झालेल्या या पक्षांतराची हवा आणखीही जोरात आहे. जयदत्त निवडणुकीच्या तोंडावर क्षीरसागर व डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडून संदीप क्षीरसागर यांना हा धक्का मानला जातो. पण , आता संदीप क्षीरसागर यांनीही काकांना ‘ जशास तसे उत्तर देण्यासाठी फिल्डींग लावली आहे.
जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वात मागील ३० वर्षापासून डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांची बीड पालिकेवर व शहरावर कमांड आहे. अनेकदा त्यांनी एकतर्फी विजय मिळविलेले आहेत. आताही त्यांच्याकडून अशीच तयारी सुरु आहे. मात्र , त्यांचेही अनेक शिलेदार नाराज आहेत. डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्याकडून अनेक वर्षे नगरसेवकपद मिळाले असले तरी सत्तेचा व पदाचा लाभ किती झाला , असा सवाल या मंडळींचा आहे. सभापतिपदे मिळाली असली तरी सह्यांच्या पुढे अधिकार काय होते अशी विचारणा त्यांच्याकडून होत आहे. त्यामुळे ओबीसी , अनुसूचित जाती व मुस्लीम समाजातील काही नाराज संदीप क्षीरसागर यांच्या संपर्कात आहेत. शहरासह ग्रामीण भागातील काही नाराजांनाही आमदारांनी हेरले आहे. त्यांच्याशी राजकीय बोलणी आणि आगामी निवडणुकीतील वाटा याबाबत चर्चा सुरु असून लवकरच प्रवेश होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. जसा काकांनी पक्षप्रवेशाचा सोहळा रंगवला त्याच्याहून मोठा सोहळा करण्याचे नियोजन आमदारांच्या गोटात सुरु आहे.