जामखेड न्युज – – –
जगात अनेक संकटांनी थैमान घातले आहे. कोरोना, युद्ध व त्यानंतर वेगाने बदलणारे हवामान यामुळे जग अस्थिरतेकडे वाटचाल तर करीत नाही ना अशी परिस्थिती तयार होत आहे. आता वातावरणातील अजब बदलाने संशोधक हैराण झाले आहेत. हवामान बदलाचा परिणाम केवळ भारतातच नाही तर जगाच्या विविध भागात दिसून येत आहे.
ADVERTISEMENT

उत्तर-दक्षिण ध्रुवांवर एकाच वेळी उष्णतेची लाट दिसून येत आहे. त्यामुळे जगबुडीची भीती वाढली आहे. बदलत्या वातावरणाचा आरोग्यावर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात कमालीचा बदल होत आहेत. कुठे पाऊस तर कुठे उकाड्याने हैराण व्हायची परिस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यायला हवी.
समुद्राची पातळी वाढत असल्याचा इशारा
हाती आलेली माहिती अधिक भीतीदायक आहे. कारण दक्षिण आणि उत्तर ध्रुवांवर एकाच वेळी उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे शास्त्रज्ञ हैराण झालेत. हवामान बदलाबाबत शास्त्रज्ञांनी पुन्हा एकदा जगाला इशारा दिला आहे. पृथ्वीवरील हवामान संकट अधिक व्यापक आणि गडद होताना दिसत आहे.आर्टिक म्हणजे उत्तर ध्रुव आणि अंटार्टिक म्हणजे दक्षिण ध्रुवावर पृथ्वीवरचा सर्वात मोठा बर्फाचा साठा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ग्लोबल वॉर्मिंगमुळे तिथला बर्फ वितळत असल्यामुळे समुद्राची पातळी वाढत असल्याचा इशारा संशोधक देत आहेत.
एकाच वेळी दोन्ही ध्रुवांवर उष्णतेची लाट
वातावरण बदलामुळे आलेली ही स्थिती जगासाठी विनाशकारी ठरू शकते असे इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमॅट चेंज म्हणजे IPCC नं म्हटले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर विनाश अटळ असल्याची भीती व्यक्त होत आहे. पृथ्वीच्या अक्ष तिरका असल्यामुळे उत्तर ध्रुवावर थंडी असते, तेव्हा दक्षिण ध्रुवावर उन्हाळा असतो. मात्र एकाच वेळी दोन्ही ध्रुवांवर उष्णतेची लाट आढळून आल्याने संशोधकांचं टेन्शन वाढले आहे.
सरासरीपेक्षा तापमान जास्त
अंटार्टिकाच्या किनारपट्टीवर टेरा नोवा बेस इथं 7 अंश तापमान झालंय. हे फ्रिजिंग पॉइंटपेक्षा कितीतरी जास्त आहे. साधारणतः मार्चमध्ये तिथं उणे तापमान असते. तर आर्टिकमधील वोस्तोक स्टेशनमध्ये 17 पूर्णांक 7 अंश सेल्सियस तापमान नोंदवलं गेलंय. सरासरीपेक्षा हे तापमान 15 अंश अधिक आहे. अंटार्टिकामध्ये 3 हजार 234 मीटर उंचीवर कॉन्कॉर्डिया स्टेशन आहे. तिथं उणे 12 पूर्णांक 2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झालीये. सरासरीपेक्षा हे तापमान 40 अंश सेल्सियस जास्त आहे.