जामखेड न्युज – – – – –
देशाला स्वातंत्र्य मिळून इतके वर्ष झाली तरी तिहेरी तलाकसारख्या कुप्रथा आणि घटना आजही घडतच असल्याचं समोर येत आहे. व्हॉट्सअॅपवर, ई-मेलवर, मेसेजवर किंवा अगदी व्हीडिओ कॉलवरुन तात्काळ तिहेरी तलाक दिले जात असल्याचंही समोर आलं होतं. मात्र तिहेरी तलाक बंदीचा कायदा संमत झाल्यानंतर आता मुस्लिम समाजातील महिला पुढं येऊन तक्रारी करत आहेत. सोलापुरात अशीच एक घटना समोर आली आहे.
ADVERTISEMENT

भांडणातून रागात पत्नीला चापट मारून तीन वेळा तलाक म्हटल्याप्रकरणी सोलापुरात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सोलापुरात एका मुस्लिम महिलेने विवाह अधिकारी संरक्षण अधिनियम 2019 च्या कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी महिलेचे पुण्यातील एजाज अहमद शेख या व्यक्तीसोबत विवाह झाला. नोकरीनिमित्त एजाज आणि त्याची पत्नी पुण्यात वास्तव्यास होते. त्यांना एक वर्षाचे मूल देखील आहे. मात्र दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पीडित महिला आपल्या माहेरी सोलापुरात आली. मात्र हा वाद काही मिटला नाही. पतीने पत्नीला नांदवले नाही. त्यामुळे पीडितेने सोलापुरात महिला तक्रार निवारण समितीकडे तक्रार नोंदविली होती.
सदर चौकशीचे कामकाज संपवून निघत असताना फिर्यादी महिलेचे सासरे इम्तियाज शेख आणि आयाज शेख यांनी वाद घातला. तसेच यावेळी पती एजाज अहमद शेख यांनी सदर महिलेस चापट मारत शिवीगाळ करत तीन वेळा तलाक तलाक तलाक असं म्हटलं.
यानंतर महिलेनं सोलापुरातल्या सदर बाजार पोलीस ठाण्यात भांदवि 323, 504, 34 आणि मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण अधिनियम 2019 चे कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.