जामखेड न्युज – – –
मुख्य परीक्षेच्या चार महिन्यांपूर्वी कोरोना झाला. तब्येत खालावल्याने आयसीयूत दाखल करावे लागले. पण परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न उराशी बागळून त्याने कोरोनावर मात केली. दररोज १४ तास एमपीएससी परीक्षेचा अभ्यास केला अन् राज्यात चौथा क्रमांक मिळविला आहे. पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी घालून तो सहायक मोटार वाहन निरीक्षक बनला. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या सहायक मोटार वाहन निरीक्षक परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या वाल्हेकरवाडीतील स्वप्नील रामचंद्र माने या तरुणाची जिद्द सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
ADVERTISEMENT
स्वप्नीलचे प्राथमिक शिक्षणही महापालिकेच्या वाल्हेकरवाडीतून झाले. त्यानंतर ८वी ते बारावीपर्यत श्री फत्तेचंद स्कुलमध्ये पूर्ण केले. राष्ट्रीय प्रज्ञा परीक्षा उतीर्ण होऊन दरमहा ५०० रूपये शिष्यवृत्ती मिळू लागली. बारावीनंतर ताथवडेतील जेएसपीएसमध्ये इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. तिथे ‘ट्युशन फी व्हीवर स्किम’ ला पात्र झाल्याने लाखो रुपये माफ करण्यात आले. इंजिनीअरिंगचा अभ्यास सुरू असतानाच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली. साध्या पत्र्याच्या घरात राहणाऱ्या माने कुटुंबियांनी मुलांना चांगले शिक्षण मिळण्यासाठी स्वत: काबाडकष्ट करण्याची तयारी दर्शविली. हातावर पोट असणाऱ्या आई- वडिलांनी मुलाच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही.
कुटुंबाची ही ससेहोलपट पहात असलेल्या स्वप्नीलने अभ्यास करून त्यांना मदत केली. टाटा टेक्नोलॉजी या कंपनीत काम करून कुटुंबाला मदत करताना वेळ मिळेल तेव्हा अभ्यास सुरू ठेवला. स्वप्नीलने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत यश मिळविले आहे. या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात प्रादेशिक परिवहन विभागातील सहायक मोटार वाहन निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण झाला आणि कुटुंबाच्या आनंदाला पारावर राहिला नाही.राज्यात चौथामहाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या २४० जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची जाहीरात आल्यावर मार्च २०२०मध्ये पूर्वपरीक्षा दिली. त्यानंतर कोविड आणि मराठा आरक्षणामुळे दीडवर्ष निकाल लांबला. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घेतलेल्या प्रादेशिक परिवहन (आरटीओ) विभागांतर्गत सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी ही परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल लागला असून स्वप्नीलने ३०० पैकी २५२ गुण मिळवित राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे.‘‘कोणत्याही परीक्षेत यश मिळविण्यासाठी घरची परिस्थिती कारणीभूत नसते. त्यासाठी जिद्द, चिकाटी, संयम आणि सातत्य ठेवल्यास स्पर्धा परीक्षा अवघड नाही. माझा मित्र अनिल निर्माले यांच्या प्रेरणेने एमपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. मला उपजिल्हाधिकारी व्हायच आहे. परिश्रमाला अभ्यासाची जोड मिळाली की यश मिळतेच.’’-स्वप्नील माने, एमपीएससी उत्तीर्ण विद्यार्थी