जामखेड न्युज – – – – –
परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी मनात जिद्द असेल तर कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करणे अशक्य नाही. हेच सलून चालकाच्या मुलाने परिस्थितीवर मात करुन दाखवून दिले. अत्यंत सामान्य कुटूंबातील मयूर रमेश पवळ याने सन: २०१९ मध्ये एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरिक्षकाच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवून आईवडिलांचं पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे.
ADVERTISEMENT 

आष्टी तालुक्यातील कडा येथील रमेश दगडू पवळ या सर्वसामान्य सलून चालकाचा मुलगा मयूर पवळ याने कौटूंबिक परिस्थितीला आपल्यासमोर झुकवले आहे. मोठ्या जिद्दीने रात्रंदिवस अभ्यास करुन मेहनतीच्या बळावर आईवडिलांच्या कष्टाला न्याय मिळवून दिला आहे. सन: २०१९ मध्ये एमपीएससीकडून घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरिक्षकाच्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश संपादन केले. मयूरचे प्राथमिक शिक्षण कडा येथील नावलौकिक अमोलक जैन शिक्षण संस्थेच्या मोतिलाल कोठारी विद्यालयात झाले तर माध्यमिक शिक्षण गांधी महाविद्यालयात घेतले आहे. परिस्थिती कितीही प्रतिकुल असली तरी मनात जिद्द अन् ध्येय निश्चित असेल तर क्षेत्र कुठलंही असो यश संपादन करणे अशक्य नसतं. हेच सलून चालकाच्या जिद्दी अवलियाने परिस्थितीवर मात करुन दाखवून दिले आहे. सामान्य कुटूंबातील मुलगा पीएसआयची परिक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे कड्यात त्याच्या मित्र परिवाराकडून मयूरची सवाद्य मिरवणूक काढून ठिकठिकाणी औक्षण करुन जोरदार स्वागत करण्यात आले. भविष्यात आपलेला डिवायएसपी होण्याचे स्वप्न असल्याचे मयूर याने सांगितले.
कष्टाला न्याय मिळाला…
————-
सलूनचे दुकान चालवून कुटूंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांचे शिक्षण पुर्ण करताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागला. परंतू मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. आपल्या परिस्थितीची जाण ठेवून मयूरने प्रचंड मेहनत घेतली. त्यामुळेच आमच्या कष्टाला न्याय मिळाला आहे.
– रमेश दगडू पवळ, वडील