दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस

0
240
जामखेड न्युज – – – 
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची (Raodsaheb Danve) अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा नाभिक समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका करताना रावसाहेब दानवे यांनी या सरकारची अवस्था तिरुपती येथील न्हाव्यांसारखी झाल्याचं सांगत, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे मारून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसे आघाडी सरकार करतेय, अशी टीका केली होती. दाववेंच्या या वक्तव्याचा नाभिक समाजाने तीव्र निषेध केला असून त्यांनी संपूर्ण नाभिक समाजाची (Nabhik Samaj) माफी मागावी, अशी भूमिका नाभिक समाजाने घेतली आहे. आज जालन्यात रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याचा पुन्हा एकदा जोरदार निषेध करण्यात आला. तसेच त्यांचीही अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस दिले जाईल, असे आवाहन नाभिक समाजाचे नेते कल्याण दळे यांनी केले.
                      ADVERTISEMENT
कुठे, कधी केलं होतं आक्षेपार्ह विधान?
नाभिक समाजाला अपमानास्पद वाटेल, असं वक्तव्य करणं रावसाहेब दानवे यांना चांगलंच भोवणार असं दिसतंय. जालन्यात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने ‘केंद्रीय अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रासाठी नेमकं काय मिळणार?’ या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात दानवे यांनी तीन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काहीच कामं केली नसून फक्त काही लाखांच्या निधीवरच रस्त्यांची बोळवण सुरु असल्याचं म्हटलं. हे बोलतानाच त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षांची तुलना तिरुपती बालाजी येथील न्हाव्यांशी केली होती. ते म्हणाले होते, तिरुपतीमधील न्हावी डोक्यावर दोन-दोन वस्तारे हाणून ग्राहकांना बसवून ठेवतात, तसं आघाडी सरकारचं सुरु आहे. विकासकामांना तुटपुंजा निधी देत महाविकास आघाडी सरकारनं लटकत ठेवलं आहे, असं दानवे म्हणाले होते. दानवेंच्या याच वक्तव्यामुळे नाभिक समाज आक्रमक झाला आहे.
काय म्हणतात नाभिक समाजाचे नेते?
नाभिक महामंडळाचे राज्याचे अध्यक्ष कल्याण दळे यांनी आज जालन्यात दानवे यांच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. दानवे यांनी संपूर्ण नाभिक समाजाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्याविरोधात उग्र आंदोलन उभारु असा इशारा त्यांनी दिला. जालन्यातील मामा चौकात नाभिक समाजाच्या वतीने आज हे आंदोलन करण्यात आले. तसेच दानवेंची अर्धी कटींग करणाऱ्याला 21 हजारांचे बक्षीस दिले जाईल, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here