जामखेड न्युज – – –
सर्वांचंच लक्ष लागून असलेल्या उत्तरप्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आता समोर येत आहे. यातील जवळपास 4 राज्यात भाजप हा क्रमांक 1 चा पक्ष ठरताना दिसत आहे. तर पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे.
अशातच या पाच राज्याच्या मतमोजणी दरम्यान आतापर्यंतचा सर्वांत धक्कादायक निकाल समोर आला आहे. उत्तराखंडमध्ये पुन्हा भाजपच सत्ता टिकवणार आणि जवळपास बहुमताचा आकडा पार करणार असं वाटत असतानाच येथील मुख्यमंत्र्यांनाच पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांना जनतेनं नाकारलं आहे.
खटिमा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार भुवनचंद्र काप्री यांनी मुख्यमंत्री धामी यांना पराभूत केलं आहे. हा भाजपसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. कारण, भाजप विजयाच्या वाटेवर असतानाच धामी पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती. पण ते स्वतःच निवडणूक हरले आहेत.
दरम्यान, उत्तराखंडच्या 70 जागांपैकी जवळपास सर्वच जागांचे कल हाती आले आहे. यामध्ये भाजपच नंबर 1 चा पक्ष असल्याचं उघड झालं आहे. भाजपने 70 पैकी जवळपास 47 जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडाही पार केला आहे. दुसरीकडे काँग्रेसला आतापर्यंत 19 जागांवरच आघाडी मिळाली आहे. त्यामुळे ते विजयापासून बरेच दूर आहेत.
चार महिन्यात तीनवेळा भाजपने मुख्यमंत्री बदलले
2017 साली भाजपने 70 पैकी 57 जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला 11 आणि इतर पक्षांना 2 जागा जिंकता आल्या होत्या. एवढ्या मोठ्या प्रमाणावर यश मिळूनही भाजपला उत्तराखंडमध्ये मागच्या वर्षी चार महिन्यात तीनवेळा मुख्यमंत्री बदलावे लागले होते. 4 वर्ष त्रिवेंद्रसिंग रावत उत्तराखंडचे मुख्यमंत्री होते, पण पक्षांतर्गत नाराजीमुळे रावत यांच्याऐवजी तिरथसिंग रावत यांना मुख्यमंत्री केलं. पण ते निवडून येऊ शकले नाहीत. त्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री बदलावे लागले आणि धामी यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपद आलं.