जामखेड न्युज – – – –
राज्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या काही दिवसात गायीच्या दुधात मोठी दरवाढ होण्याची शक्यता आहे. यामागचे कारणही तसंच आहे. उन्हाचा वाढता तडाखा आणि दुधाळ जनावरांच्या संख्येत झालेली घट यामुळे दूध उत्पादन सुमारे तीन टक्क्यांनी कमी झाले आहे. त्यातच राज्याबाहेरील दूध संस्था राज्यातील दूध घेऊन जात असल्याने राज्यात दुधाची कमतरता जाणवू लागली आहे.
दूध उत्पादन कमी झाल्याने पावडर उत्पादनासाठी आवश्यक तेवढे दूध मिळेनासे झाले आहे. यामुळे पावडर आणि लोण्याच्या मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाली आहे. परिणामी राज्यातील सहकारी आणि खासगी क्षेत्रातील डेअरींनी शेतकऱ्यांकडून होणाऱ्या दूध खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्याच्या घडीला गायीच्या दुधाला साधारणत: 27 ते 30 रुपयांच्या आसपास दर मिळत आहे. आता या दरामध्ये जवळपास 3 ते 5 रुपयांची रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे अमूलने आपल्या मूळ खर्चात वाढ झाल्याचे सांगून दुध विक्री दरात वाढ केली आहे. त्यामुळे मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये गायीच्या आणि म्हशीच्या दूध विक्री दरात प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना संकटाचा मोठा फटका राज्यातील दूध उत्पादकांना बसला होता. त्यावेळी गायीच्या दुधाला 21 ते 22 रुपयांच्या आसपास दर मिळत होता. त्याचा मोठा फटका दूध उत्पादकांना बसत होता. मात्र, आता कोरोनचा धोका कमी झाला आहे. त्यामुळे दुधाच्या मागणीत देखील वाढ झाली आहे. तसेत दूध भुकटीला वाढणारी मागणी लक्षात घेत लवकरच आणखी दुधाच्या दरात वाढ होणार असून दूध उत्पादकांना 33 ते 34 रुपयांचा दर मिळण्याची शक्यता आहे.





