वर्ध्यातील पुलाखाली रक्त अन् मांसाचा सडा; 7 MBBS विद्यार्थ्यांचा मृत्यू! भीषण अपघाताचा घटनाक्रम

0
273
 जामखेड न्युज – – – – 
वर्धा जिल्ह्यात मंगळवारी एक भीषण अपघात झाला. हा अपघात इतका मोठा होता की गाडीतील सात विद्यार्थ्यांचा यात जागीच मृत्यू झाला. सावंगी (मेघे) येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी यवतमाळ-नागपूर मार्गाने परत येत असताना देवळी लगतच्या सेलसुरा येथे वाहन पुलाच्या संरक्षक भिंतीवर धडकले. वाहन भिंतीवर धडकताच सातही युवक वाहनातून फेकले गेले. वाहनातून फेकले गेलेले युवक थेट पुलाच्या खाली असलेल्या दगडांवर आदळले. या अपघातात एमबीबीएसच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.यावेळी पुलाच्या खाली अक्षरशः रक्ताचा आणि मांसाचा पडलेला सडा अंगाचा थरकाप उडविणारा होता. दरम्यान, घटनास्थळी पोलीस पोहचल्यावर दृश्य पाहून ते देखील स्तब्ध होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात गाडीचा अक्षरश: चुराडा झाला आहे. महामार्गालगत असलेले कठडे तोडून गाडी नदीवरील जुन्या आणि नवीन पुलाच्या मध्यभागी जवळपास 40 फूट खाली कोसळली. अपघातात भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचाही समावेश आहे. एका विषयार्थ्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी हे सर्वजणबाहेर गेले होते अशी माहिती सावंगी मेघे मेडिकल कॉलेजचे विशेष कार्यकारी अधिकारी उदय मेघे यांनी दिली.
नीरज चव्हाण, आविष्कार रहांगडाले, नितेश सिंग, विवेक नंदन, प्रत्युश सिंग, शुभम जैस्वाल, पवन शक्ती ही अपघातात ठार झालेल्यांची नवे आहेत. भरधाव निघालेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या वाहनाची गती नेमकी किती हे कळायला मार्ग नाही. परंतु, अपघातग्रस्त वाहनाचे गती दर्शवणारे मीटर १६० वर लॉक झाले होते. घटना स्थळाच्या शंभर मीटर आधी रस्त्यावर टायर घासल्याची चिन्ह असल्याने नेकमी वाहनाची गती किती हा प्रश्न कायम आहे.
अपघाताची माहिती मिळताच सांवगी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मृत विद्यार्थ्यांची ओळख पटताच शिकत असलेल्या महाविद्यालयाला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची भीषणता बघता पोलिस प्रशासनही स्तब्धच होते. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात रवाना केले. सोमवारी (24 जानेवारी) रात्री दीडच्या सुमारास हा अपघात झाला. पहाटेपर्यंत बचाव कार्य चालले. अपघात घडल्याची माहिती मिळताच पोलिस प्रशासना बरोबर फॉरेन्सिक एक्स्पर्टकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला.
अपघाताची भीषणता
सुरक्षेच्या दृष्टीकोणातून वाहनांना चालक आणि चालकांच्या शेजारी बसणाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एअर बॅग लावण्यात येतात. या अपघातात एअरबॅग खुलल्या. परंतु, त्यांचाही लाभ झाला नाही. या बॅग फुटून रस्त्यावर पडल्याचे दिसले. यावरून अपघाताची भीषणता लक्षात येते.
नागपूर-वर्धा-यवतमाळ चौपदरी राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामात अनेक त्रुटी आहेत. यातूनच सेलसुरा येथील भदाडी नदीजवळ अपघात झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
वैद्यकीय महाविद्यालयाने स्वीकारले मृतांचे पालकत्व
दरम्यान, या अपघातातील सातही मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत. अपघातात मृत विद्यार्थी परराज्यातील असल्याने त्यांचे पालक वर्ध्यात दाखल होण्यास किमान १२ तास इतका वेळ लागेल. तोपर्यंत शवविच्छेदन ताटकळत ठेवणे शक्य नसल्याने महाविद्यालय प्रशासनाने शवविच्छेदन करण्यासाठी पोलिसांना लेखी अर्ज करीत पालकांची जबाबदारी स्वीकारली आहे. एकाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, मृतदेह रवाना करण्यात आला. याव्यतिरिक्त मृत सहा विद्यार्थ्याचे शव विच्छेदन करून सावंगी येथील शवागारात ठेवण्यात येणार आहे. त्यांचे पालक आल्यानंतर मृतदेह स्वाधिन करण्यात येणार आहे.
पंतप्रधानांतर्फे मदत
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत पावलेल्यांच्या कुटुंबाला 2 लाख रुपयांची मदत, तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here