जामखेड न्युज – – – –
नगर जिल्ह्यातील सोयर्या धायर्यांचे राजकारण हा विषय नेहमीच चर्चेचा. ते म्हणजे जिल्ह्यातील दोन राजकारणी घराण्यात सोयरीक जुळून येत आहे. मागील काही दिवसांपासून चर्चा असलेली नगर जिल्ह्यातील एक राजकीय सोयरिक अखेर जुळून आली.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे नातू आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शिवसेनेचे शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांचा विवाह राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्याशी करण्याचे ठरले आहे. लवकरच होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी ही नवी सोयरीक एका जुन्या सोयऱ्यांच्या गटाला धक्का देणारी मानली जात आहे.
गडाख आणि घुले कुटुंबियांचे विधानसभा मतदारसंघ शेजारी शेजारी आहेत. त्याचप्रमाणे राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने ते राजकीयदृष्ट्याही एकत्र आलेले आहेत.
सध्या या राजकीय घराण्याच्या विषय जिल्ह्यात चर्चिला जात आहे. याचे कारण म्हणजे आगामी विधान परिषद सभा.या नव्या नातेसंबंधांची राजकीय झलक त्यावेळी पाहायला मिळणार आहे. कारण सध्या भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
त्यासाठी त्यांचे सोयरे असलेले सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण जगताप आणि दुसरे सोयरे कोतकर यांचे समर्थक यांची मदत घेतली जाणार आहे. शिवाय भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्डिलेंना ताकद दिल्याचे सांगण्यात येते.
या समीकरणाविरोधात आता घुले-गडाख-थोरात हे सोयरे रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरमधील सोऱ्या-धायऱ्यांच्या गटाला शेवगाव-नेवासामधील हा नवा गट शह देण्यासाठी रिंगणात उतरेल,
असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या राजकारणात पक्ष कोणताही असला तरी सत्ता सोयर्या-धायर्यांचीच असते, असे गमतीने म्हटले जाते. आता या नव्या घडामोडींनुसार पुन्हा एकदा त्याला पुष्टी मिळाल्याचे दिसत आहे.