जामखेड न्युज – – –
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचं कौतुक विरोधक देखील करत असतात. त्यांनी देशभर केलेल्या रस्त्यांच्या कामाचं कौतुक तर नेहमीच होत असतं. मात्र खुद्द भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामासंदर्भात एक ट्वीट केलं. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने तात्काळ याची दखल घेत संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, पैठण पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 752 ला काम पूर्ण होण्याच्या आधीच भेगा पडल्या आहेत. माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी यांना पत्र लिहीनच. त्यांनाही हे अजिबात चालणार नाही. तात्काळ दखल घेतली जाईल, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. सोबतच पंकजा मुंडे यांनी एक फोटो देखील पोस्ट केला आहे.
या ट्वीटला लगेच नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून उत्तर देण्यात आलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये सांगितलं आहे की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सर्व खराब झालेले रस्त्यांची कामं देखील लवकरात लवकर केली जातील, असं नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.