जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – (सुदाम वराट)
देशात एवढी महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेल तेलाचे भाव खूप वाढले आहेत. लोकांनी धर्मांधता आणि धार्मिक धृवीकरणाच्या जाळ्यात न अडकता रोजगार आणि महागाईच्या मुद्द्यावरून सरकारला प्रश्न विचारावेत. असे प्रतिपादन आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी जामखेड येथे केले. आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांनी राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच ते ग्रामीण भागातील जामखेड येथे आले होते. तालुक्यातील तरुणांना त्यांचे विचार समजावे आणि प्रेरणा मिळावी म्हणून, १६ सप्टेंबर रोजी युवक क्रांती दल संघटनेकडून भाषणाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी युक्रांदचे सहकार्यवाह अप्पा अनारसे, पर्यावरण तज्ज्ञ डॉ. प्रवीण सप्तर्षी, युक्रांदचे पुणे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, अभिजीत मंगल, सामाजसेवक अरूण जाधव, लक्ष्मण घोलप, संयोजक म्हणून विशाल राऊत, अनिल घोगरदरे, विशाल नेमाने, विशाल रेडे, विजय घोलप हे उपस्थित होते.
आयएएस अधिकारी कन्नन गोपीनाथन यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे –
२१ दिवसात कोरोना संपणार होता का?
कोविड १९ समस्या वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपाययोजना म्हणून संपूर्ण देश २१ दिवस बंद केला. मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली. या निर्णयामुळे स्थलांतरित कामगार आपल्या घरी जाऊ शकत नव्हते. त्यांनी घेतलेला निर्णय चुकीचा होता. यावर उपाय म्हणून जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करणे गरजेचे होते. केंद्रसरकारने फक्त लॉकडाऊन केला, मात्र उपाययोजना केल्या नाहीत. सर्वांनी घराच्या बाल्कनीमध्ये येऊन टाळ्या आणि थाळ्या वाजवाव्यात. या मोदींच्या आवाहनाची अडचण काही नव्हती. मुद्दा हा होता की, सर्वांच्या घरी बाल्कनी आहे असा विचार करणे. असे मत कन्नन गोपीनाथन यांनी व्यक्त केले.
स्थलांतरित कामगारांनी आपल्याच देशात लाठ्या-काठ्या खाल्ल्या
लॉकडाऊन काळात स्थलांतरित कामगार घरी जात असताना, पोलिसांनी त्यांना काठीने मारले. सरकारने त्यांना घरी जाण्याची कुठलीही सोय केली नव्हती. सर्व वाहतूक व्यवस्था बंद होती. त्यामुळे ते पायी किंवा सायकलवर घरी चालले होते. तरीपण कामगारांनी स्वत:च्याच देशात काठीने मार खाल्ला. याचे कारण हे होते की, आपल्या देशात प्रजा आणि राजा यामध्ये खूप मोठं अंतर आहे. स्वातंत्र्य ही गोष्ट सामान्यांना अनुभवायला मिळत नाही. असे मत कन्नन गोपीनाथन यांनी व्यक्त केले.
देशात चाणक्य कोण आहे?
बरेच जण म्हणतात अमित शाह, शरद पवार किंवा इतर नेते चाणक्य आहेत. पण माझा प्रश्न आहे की, या देशात चाणक्य का हवेत? देशात साम, दाम, दंड, भेद नितीचे अवलंब करणारे चाणक्य जनतेला आवश्यक आहेत का? जनतेच्या प्रश्नांचे उत्तरे देणारा आणि त्यांचे प्रश्न सोडवणारा खरा चाणक्य आहे. नागरिकांनी न भीता अधिकाऱ्यांना आणि सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. आज आपल्या भारतात प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही म्हटले जाते. असे कन्नन गोपीनाथन म्हणाले.
सरकारला प्रश्न विचारा –
देशात एवढी महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेल तेलाचे भाव खूप वाढले आहेत. लोकांनी धर्मांधता आणि धार्मिक धृवीकरणाच्या जाळ्यात न अडकता सरकारला प्रश्न विचारावेत. असेही कन्नन गोपीनाथन म्हणाले. देशात एखाद्याला नोकरी मिळत नाही, असं असेल तर तो वैयक्तीक अडचण असेल. मात्र, देशात अनेकांना रोजगार मिळत नाही. असं असेल तर ती सरकारची जबाबदारी असून, बेरोजगारी वाढली आहे, असा अर्थ होतो. एकेकाळी मनरेगा योजनेवर लोक टिका करायचे. आज मात्र हीच योजना नागरिकांना रोजगार देत आहे.
कन्नन गोपीनाथन कोण आहेत?
कन्नन गोपीनाथन यांचा जन्म १२ डिसंबर १९८५ साली केरळ राज्यात झाला. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण केरळमध्येच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी इंजिनिअरिंगचे शिक्षण बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी, झारखंड येथे पूर्ण केले. तिथं त्यांनी अभ्यासात सुवर्ण पदकही मिळविले. त्यानंतर त्यांनी एका खासगी कंपनीत नोकरी केली. त्या नोकरीचा राजीनामा देऊन त्यांनी युपीएससी या परीक्षेचा अभ्यास केला व २०१२ साली ५९ रँक मिळवून परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी मिझोराम आणि दादरा नगर हवेली येथे जिल्हाधिकारी म्हणून पदभार सांभाळला. केंद्रसरकारच्या काही धोरणांवरून मतभेद झाल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आयएएस कन्नन गोपीनाथन यांनी राजीनामा दिला. आता ते देशभर व्याख्यानं देत फिरतात. सामाजीक कामात सक्रीय असतात तसेच विद्यार्थ्यांना आणि सामान्यांना मार्गदर्शन करतात