जामखेड म्हटलं की ज्वारीचा कोठार! पण यंदा त्याच कोठारात ज्वारीच शिल्लक नाही. दुष्काळाने शेतकऱ्याचं शेत खाल्लं, आता गरीबांच्या ताटातली भाकरीही खायला निघाला आहे. तालुक्यात यंदा दुष्काळाने भीषण रूप धारण केले आहे. अपुऱ्या पावसामुळे ज्वारीचे पीक करपले असून, शेतकऱ्यांचे ९० ते ९५ टक्के नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पोटच्या लेकरासारखे जपलेले पीक डोळ्यांदेखत वाळल्याने शेतकरी हतबल झाला आहे. सध्या ज्वारीचा भाव प्रति किलो शंभरीपार झाला आहे. यामुळे गरीबांच्या ताटातील ज्वारीची भाकरी महागली आहे.
जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावात केवळ मृतसाठा शिल्लक असून, शहराला १५ दिवसांनी पाणी मिळत आहे. तालुक्यातील ३३ गावांना ३७ टँकरच्या ४५ खेपांद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. टँकर भरण्यासाठी कर्जत तालुक्यातील मांदळीचा आधार घ्यावा लागत आहे.
जनावरांच्या चाऱ्याची टंचाईही गंभीर बनली आहे. आमदार रोहित पवार यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत, चारा छावण्या आणि कर्जवसुलीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. दहिगाव-उजनी पाणी योजनेला गती मिळत असली, तरी जामखेडकरांचा सवाल कायम आहे — ज्वारीचे कोठार करपले, पाण्यासाठी टँकरची वणवण सुरू आहे; जामखेडला हक्काचे पाणी कधी मिळणार?
ज्वारीच्या कोठारातच ज्वारी करपली; ९० ते ९५ टक्के नुकसान होण्याची भीती! जामखेड तालुका ज्वारी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र यंदा अपुऱ्या पावसाने ज्वारीच्या पिकाचे मोठे नुकसान केले आहे. अनेक ठिकाणी ज्वारीची उगवणच झाली नाही, तर काही शेतांमध्ये विरळ आणि सुकलेली रोपे दिसत आहेत. जमिनीतील ओलावा संपल्याने पिकांची वाढ खुंटली असून, विहिरीही कोरड्या पडल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा ज्वारीच्या उत्पादनात ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत नुकसान होण्याची भीती आहे. मागील वर्षीही पीक समाधानकारक नव्हते. त्यात यंदा आणखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात मोठी भर पडली आहे.
शेजारच्या तालुक्यांना पाणी; जामखेड मात्र वंचित? ६ टीएमसीसाठी न्यायालयीन लढ्याचा इशारा जामखेडच्या पाणीप्रश्नावरून आता राजकीय आणि प्रशासकीय पातळीवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. कुकडीचे पाणी कर्जत, करमाळा आणि आष्टीला मिळते, तर कृष्णा-भीमा स्थिरीकरणाच्या पाण्याचा लाभ आष्टी, पाटोदा, भूम, परांडा, बारामती आणि इंदापूरसारख्या भागांना मिळत असल्याचा दावा केला जात आहे.
मात्र जामखेड तालुक्याला या योजनांमधून अपेक्षित पाणी मिळत नसल्याचा आरोप ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात यांनी केला आहे. जामखेडला ६ टीएमसी पाणी मिळावे, यासाठी न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.