Home ताज्या बातम्या भविष्यातील विकासाचा विचार करून सहकार्य करा – अमित चिंतामणी जामखेड अतिक्रमण...

भविष्यातील विकासाचा विचार करून सहकार्य करा – अमित चिंतामणी जामखेड अतिक्रमण हटाव मोहिमेवरून व्यापारी आक्रमक!

0
4
भविष्यातील विकासाचा विचार करून सहकार्य करा – अमित चिंतामणी  जामखेड अतिक्रमण हटाव मोहिमेवरून व्यापारी आक्रमक!

जामखेड न्युज – – – – – 

भविष्यातील विकासाचा विचार करून सहकार्य करा – अमित चिंतामणी

जामखेड अतिक्रमण हटाव मोहिमेवरून व्यापारी आक्रमक!

शहराच्या भविष्यातील विकासकामांचा विचार करून व्यापाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. अतिक्रमण हटावाच्या प्रक्रियेत कोणाचेही नुकसान होऊ नये, तसेच सर्वांना समान न्याय मिळावा, यासाठी समन्वयाने मार्ग काढणे आवश्यक असल्याचे अमित चिंतामणी त्यांनी स्पष्ट केले.

जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम, भीती आणि असंतोष दूर करण्यासाठी व्यापारी व नगरपरिषद यांच्यात समन्वय बैठक आयोजित करण्यात आली होती. शहराच्या विकासकामांना व्यापाऱ्यांचे सहकार्य राहील, मात्र अतिक्रमण हटविताना कोणावरही अन्याय होऊ नये आणि सर्वांना समान न्याय मिळावा, अशी ठाम भूमिका या बैठकीत मांडण्यात आली.

यावेळी अमित चिंतामणी, नगरसेवक अॅड. प्रवीण सानप, विकी घायतडक, प्रवीण चोरडिया, मनोज कुलकर्णी, अशोक शेळके, बाबासाहेब पोठरे, संजय कोठारी, सुनील उगले, विकास बाफना, प्रफुल्ल सोळंकी, त्रिंबक कुमटकर, बापू राख, अजय कोठारी, सौरभ उगले, अभय बाफना, सुमतीलाल बोथरा, पेचे, प्रशांत बोरा, उदय शिंदे, मुंडे मॅडम, ऋषिकेश बांभरसे, ऋषिकेश खरात आणि सुनील कोठारी यांच्यासह व्यापारी व नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरात सध्या भयभीत वातावरण निर्माण झाले असून, अनेक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर आणि मालमत्तेवर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेऊन सर्व संबंधितांना विश्वासात घ्यावे आणि या प्रश्नावर समन्वयातून तोडगा काढावा, अशी अपेक्षा बैठकीत व्यक्त करण्यात आली. शहरात निर्माण झालेले भय आणि संभ्रम दूर करून व्यापाऱ्यांना विश्वासात घेणे गरजेचे आहे. विकासकामे करताना नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन प्रशासनाने योग्य तो मार्ग काढावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

रमेश गुगळे यांचा सवाल – व्यापारी आणखी किती सहन करणार?
व्यापारी रमेश गुगळे यांनी बैठकीत व्यापाऱ्यांच्या अडचणी आणि मनातील नाराजी स्पष्ट शब्दांत मांडली. व्यापार हीच जामखेड शहराची ओळख असून, सध्याच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे सर्वांचे नुकसान होत आहे, असे त्यांनी सांगितले.अतिक्रमण हटावाच्या कारवाईत केवळ दुकानांवरच नव्हे, तर काही ठिकाणी घरांवरही परिणाम झाल्याचे त्यांनी नमूद केले. व्यापारी हा नेहमीच सोशिक राहिला असून, शहराच्या विकासासाठी व्यापाऱ्यांनी सहकार्य केले आहे. दहा फुटांच्या प्रस्तावालाही सर्वांनी मान्यता दिली आहे. विकासकामांना विरोध करण्याची आमची भूमिका नाही; मात्र त्यासाठी व्यापाऱ्यांनी आणखी किती सहन करायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

नगरसेवक विकी घायतडक म्हणाले की, न्यायालयाच्या आदेशानुसार काम सुरू आहे. नगरपरिषदेची कारवाई नाही
त्यामुळे सुरू असलेल्या प्रक्रियेत कायदेशीर बाबी लक्षात घेऊन व्यापारी आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

समान न्याय आणि पारदर्शक कारवाईची अपेक्षा
जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमण हटावाचा प्रश्न सध्या शहरात चर्चेचा विषय बनला आहे. कारवाई करताना दोन्ही बाजूंच्या व्यापाऱ्यांना समान न्याय मिळावा, मोजणी व हद्दींबाबत स्पष्टता असावी आणि कोणत्याही व्यापाऱ्यावर अन्याय झाल्याची भावना निर्माण होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शहराच्या विकासासाठी रस्ते रुंदीकरण आणि अतिक्रमण हटाव आवश्यक असले, तरी या प्रक्रियेत व्यापाऱ्यांचे प्रश्न, त्यांच्या मालमत्तेचे नुकसान आणि व्यवसायावर होणारे परिणाम यांचाही विचार व्हावा, अशी मागणी बैठकीतून पुढे आली. प्रशासनाने व्यापाऱ्यांशी सातत्याने संवाद साधून गैरसमज दूर करावेत आणि सर्वांना मान्य होईल असा मार्ग शोधावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

जामखेडमधील अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांच्या मनातील भीती दूर करणे, समान न्यायाची खात्री देणे आणि विकासकामांना सहकार्य मिळविणे, ही प्रशासनासमोरील महत्त्वाची आव्हाने आहेत. व्यापाऱ्यांनी विकासाला विरोध नसल्याचे स्पष्ट करतानाच अन्याय सहन केला जाणार नसल्याची भूमिका मांडली आहे. त्यामुळे या बैठकीतून पुढे कोणता मार्ग निघतो आणि अतिक्रमण हटाव मोहिमेबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे आता जामखेडकरांचे लक्ष लागले आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!