राष्ट्रीय महामार्ग ५४८-डीवरील शासकीय जागेवरील अतिक्रमणे हटणार महसूल, महामार्ग, नगरपरिषद, पोलीस प्रशासन व सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या बैठकीत एकमत निर्णय स्वागतार्ह; पण अंमलबजावणी महत्त्वाची – अवधूत पवार
राष्ट्रीय महामार्ग ५४८-डीवरील शासकीय जागेवरील अतिक्रमणे हटणार
महसूल, महामार्ग, नगरपरिषद, पोलीस प्रशासन व सर्वपक्षीय प्रतिनिधींच्या बैठकीत एकमत
निर्णय स्वागतार्ह; पण अंमलबजावणी महत्त्वाची – अवधूत पवार
जामखेड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डीच्या रखडलेल्या कामाला अखेर गती मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या चार वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडलेल्या या महामार्गाच्या कामातील सर्वात मोठा अडथळा ठरलेल्या शासकीय जागेवरील अतिक्रमणांबाबत प्रशासनाने निर्णायक भूमिका घेतली आहे. महसूल विभाग, राष्ट्रीय महामार्ग विभाग, नगरपरिषद, पोलीस प्रशासन, आंदोलनकर्ते तसेच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त बैठकीत शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियमानुसार हटविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एकमताने घेण्यात आला.
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या शासकीय भूखंडांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे रस्त्याच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला होता. भूमी अभिलेख विभागाने केलेल्या अधिकृत मोजणीनुसार शासकीय जागेची सीमा निश्चित करण्यात आली असून, त्यानुसार अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई शांततेत आणि नियमानुसार पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला..
यापूर्वी अतिक्रमणधारकांना प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्या नोटिसांना विरोध करत काही अतिक्रमणधारकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयात खोटी माहिती सादर केल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित याचिका फेटाळून लावत न्यायालयाने दहा याचिकाकर्त्यांवर प्रत्येकी ₹५० हजारांचा दंड ठोठावला. या निर्णयामुळे अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईतील कायदेशीर अडथळे दूर झाले असून, प्रशासनाला पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे.
बैठकीतील निर्णयामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डीच्या कामाला आता प्रत्यक्ष गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महामार्गाचे उर्वरित काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.
चौकट “निर्णय स्वागतार्ह; पण अंमलबजावणी महत्त्वाची” “बैठकीत शासकीय जागेवरील अतिक्रमण नियमानुसार हटविण्याचा निर्णय घेण्यात आला, ही निश्चितच सकारात्मक बाब आहे. मात्र, प्रत्यक्षात अतिक्रमण हटवून राष्ट्रीय महामार्ग ५४८-डीचे रखडलेले काम सुरू होईपर्यंत आमचा संघर्ष कायम राहणार आहे. प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करून जनतेला लवकरात लवकर दिलासा द्यावा.” — आंदोलनकर्ते अवधूत पवार