जामखेड न्युज – – – – –
जामखेड तालुक्यातील नाहुली येथे तीन शेळ्या चोरी; ₹२१ हजारांचा ऐवज लंपास, खर्डा पोलिसांत गुन्हा दाखल
जामखेड तालुक्यातील नाहुली (ब्रह्मनाथ वस्ती) येथे अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील जाळीत बांधलेल्या तीन शेळ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खर्डा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश संजय बहिर (वय ३२, रा. ब्रह्मनाथ वस्ती, नाहुली, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, दि. १८ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० ते १९ जुलै रोजी सकाळी ६.०० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील जाळीत बांधलेल्या काळ्या रंगाच्या शिंग असलेल्या तीन शेळ्या चोरून नेल्या.

सकाळी उठल्यानंतर शेळ्या दिसून न आल्याने त्यांनी परिसरात शोधाशोध केली. नातेवाईकांनाही याबाबत माहिती दिली. मात्र शेळ्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. त्यानंतर त्यांनी खर्डा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.






