जिजाऊंचे विचार आजही प्रेरणादायी, जामखेडमध्ये स्मृतीज्योत रथयात्रेचे जल्लोषात स्वागत
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉं साहेब यांच्या ३५३ व्या पुण्यतिथीनिमित्त सिंदखेडराजा ते पाचाड या ऐतिहासिक स्मृतीज्योत रथयात्रेचे जामखेड शहरात सोमवारी शिवभक्तांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात आणि “जय जिजाऊ, जय शिवाराय”च्या गगनभेदी घोषणांनी जल्लोषात स्वागत करण्यात आले. संपूर्ण शहर जिजाऊ-शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमून गेले होते. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी नागरिक, युवक, महिला व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
रथयात्रेचे शहरात आगमन होताच विविध सामाजिक संस्था, शिवप्रेमी संघटना व नागरिकांच्या वतीने फुलांची उधळण करून तसेच पुष्पहार अर्पण करून भव्य स्वागत करण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी जिजाऊंच्या कार्याचा व त्यागाचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा निर्धार व्यक्त केला.
स्वागत समारंभात बोलताना जिजाऊंचे वंशज भागवत राजे जाधव म्हणाले, “राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब यांनी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याचा संकल्प प्रत्यक्षात साकार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वामागे जिजाऊंचे संस्कार, दूरदृष्टी, राष्ट्रप्रेम आणि न्यायनिष्ठा होती. त्यांनी बालशिवबांना केवळ युद्धकला नव्हे, तर प्रजेप्रती असलेली जबाबदारी, धर्मनिरपेक्षता, स्त्रीसन्मान आणि स्वाभिमानाचे धडे दिले. त्यांच्या संस्कारातूनच हिंदवी स्वराज्याची निर्मिती झाली.”
प्रा. मधुकर आबा राळेभात यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “राष्ट्रमाता जिजाऊ यांनी या देशाला दोन छत्रपती दिले. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपाने त्यांनी आदर्श नेतृत्व घडवले. संकटांच्या काळातही त्यांनी खंबीरपणे स्वराज्याचा ध्यास सोडला नाही. त्यांचे संपूर्ण जीवन हे राष्ट्रभक्ती, त्याग, शौर्य आणि संस्कारांचे विद्यापीठ आहे.” नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी म्हणाल्या, “गुलामगिरी, अन्याय आणि अत्याचाराविरोधात लढण्याची प्रेरणा राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब यांच्या जीवनातून मिळते. स्त्रीशक्ती, राष्ट्रनिष्ठा, सामाजिक समता आणि न्यायाची शिकवण देणारे त्यांचे कार्य आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. नवीन पिढीपर्यंत जिजाऊंचे विचार पोहोचविणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे.”
माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी काका राळेभात म्हणाले, “सिंदखेडराजा ते पाचाड ही ऐतिहासिक स्मृतीज्योत रथयात्रा जामखेड शहरातून जात असल्याने हा प्रत्येक जामखेडकरासाठी अभिमानाचा क्षण आहे. या रथयात्रेच्या माध्यमातून जिजाऊंच्या कार्याचा आणि हिंदवी स्वराज्याच्या विचारांचा संदेश घराघरात पोहोचत असून समाजात राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ होत आहे.”
यावेळी उपस्थितांनी राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृतीला अभिवादन केले. शिवभक्तांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. भगव्या ध्वजांनी सजलेले वातावरण, ढोल-ताशांचा गजर आणि शिवभक्तांचा उत्साह यामुळे संपूर्ण जामखेड शहर शिवमय झाले होते.
या स्वागत सोहळ्यास प्रा. मधुकर आबा राळेभात, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी काका राळेभात, नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, मराठा सेवक अवधूत पवार, नगरसेविका नंदाताई होळकर, सिमाताई कुलकर्णी, सुमनताई शेळके, नगरसेवक मोहन पवार, पवन राळेभात, मनोज कुलकर्णी, राजेंद्र गोरे, वसीम सय्यद, प्रशांत राळेभात, कॅप्टन भोरे, तात्यासाहेब बांदल, गुलाब जांभळे, विनायक राऊत, हरिभाऊ आजबे, अमित जाधव, कुंडल राळेभात, संभाजी मुळे, संभाजी ढोले, डॉ. भरत देवकर, सागरशेठ अंदुरे, प्रविण उगले, अनिल अडाले, सचिन शिंदे, बजरंग सरडे, गणेश हागवणे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महिला, युवक आणि मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी राष्ट्रमाता जिजाऊ मॉं साहेब यांच्या विचारांचे जतन व संवर्धन करण्याचा तसेच स्वराज्य, सामाजिक समता, राष्ट्रप्रेम आणि संस्कारांचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला. स्मृतीज्योत रथयात्रेच्या निमित्ताने जामखेडमध्ये निर्माण झालेले शिवमय वातावरण आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग हा जिजाऊंप्रती असलेल्या श्रद्धा, निष्ठा आणि आदराचे प्रतीक असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली.