जामखेड येथील शासकीय निवासी शाळेचे लोखंडी गेट तोडल्याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल
जामखेड येथील आरोळेनगर परिसरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळेच्या आवारातील नुकतेच बसविण्यात आलेले लोखंडी प्रवेशद्वार अज्ञात व्यक्तींनी तोडून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत २ जुलै रोजी शाळेच्या पूर्व बाजूस लोखंडी गेट बसविण्यात आले होते. त्याच रात्री अज्ञात व्यक्तींनी गेटचे कुलूप तोडून गेट बाजूला ढकलले व सुमारे पाच हजार रुपयांचे नुकसान केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर मुख्याध्यापक राहुल दळवी यांनी जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम, १९८४ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार संजय लोखंडे करीत आहेत.
सदर शासकीय परिसरात अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह कार्यरत आहे.
परिसरातील काही स्थानिकांकडून अनधिकृत ये-जा, वाहनतळाचा वापर, कचरा टाकणे, सांडपाणी सोडणे, संरक्षक भिंतीचे नुकसान करणे तसेच शासकीय मालमत्तेची हानी करण्याचे प्रकार वारंवार घडत असल्याची नोंद संबंधित विभागाने केली आहे. तसेच अशा प्रकारांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धमकावण्याच्या घटनाही घडत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
या पार्श्वभूमीवर परिसरात दिवस-रात्र पोलीस गस्त वाढविणे, अनधिकृत वावरास प्रतिबंध करणे तसेच विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी पोलीस अधीक्षक व तहसीलदार यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. तसेच, याप्रकरणी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले आहेत.