अनुसूचित जाती उपवर्गीकरण विरोधात बीड ते मुंबई लाँग मार्चचे जामखेडमध्ये स्वागत
अनुसूचित जातीच्या ‘अ, ब, क, ड’ आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ थांबवा या मागणीसाठी अनुसूचित जाती एकता समितीच्या वतीने बीड ते मंत्रालय मुंबई ‘चलो मुंबई’ पायी लाँग मार्च काढण्यात आला आहे. हा लाँग मार्च जामखेडमार्गे आला असता शहरात आंबेडकरी समाजाच्या वतीने त्याचे जंगी स्वागत करण्यात आले.
बीड रोड मार्केट यार्डसमोर स्वागत, संविधान भेट जामखेड शहरातील बीड रोड, मार्केट यार्डसमोर लाँग मार्चचे आंबेडकरी अनुयायांनी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. यावेळी लाँग मार्चमधील प्रमुख कार्यकर्त्यांना भारतीय संविधानाचे पुस्तक भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
तद्नंतर शहरातून “महापुरुषांचा विजय असो”, “भारतीय संविधानाचा विजय असो”, “जय भीम-जय शिवराय” अशा घोषणा देत भव्य रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात कॉर्नर सभा घेऊन उपवर्गीकरणाच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला.
“मुख्यमंत्री हिंदू-मुस्लिम, मराठा-ओबीसी, आता बौद्ध-मातंग वाद लावतायत” – विकीभाऊ सदाफुले
कॉर्नर सभेत बोलताना सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
“राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यापासून हिंदू-मुस्लिम, मराठा-ओबीसी आणि आता बौद्ध म्हणजेच पूर्वाश्रमीचे महार-मातंग यांच्यात वाद लावून दिला आहे. महार-मातंग एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आमच्यात फूट पाडून, भावाभावात भांडणे लावून राजकीय पोळी भाजण्याची मुख्यमंत्र्यांची खेळी आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाहीत” असा घणाघात सदाफुले यांनी केला.
“उपवर्गीकरण म्हणजे अनुसूचित जातीत फूट पाडण्याचे षड्यंत्र आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या घटनात्मक आरक्षणाला धक्का लावण्याचा डाव आम्ही हाणून पाडू. हा लाँग मार्च म्हणजे सरकारला इशारा आहे” असेही ते म्हणाले.
लाँग मार्चचा उद्देश
अनुसूचित जाती एकता समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाला मंजुरी दिली असली तरी राज्य सरकारने याची अंमलबजावणी घाईने करू नये. यामुळे अनुसूचित जातीतल्या ५९ जातींमध्ये दुही माजेल. ‘एकच मिशन, एकच जात – अनुसूचित जात’ हा आमचा नारा आहे. उपवर्गीकरण रद्द होईपर्यंत हा लढा सुरूच राहील.”
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, बौध्दाचार्य अशोक आव्हाड,राजन समिंदर,अनिल सदाफुले, सिध्दार्थ साळवे,रत्नाकर सदाफुले,सागर घायतडक,विनोद सोनवणे,अतिश पारवे, मुकूंद घायतडक,दादासाहेब घायतडक, रंजन मेघडबंर,विनोद घायतडक,सचिन सदाफुले,योगेश घायतडक,किशोर कांबळे, अतिश डाडर,अंकुश पुलावळे,प्रमोद सदाफुले,सोनू सदाफुले,अंकल घायतडक,विकीभाई गायकवाड,अक्षय घायतडक, महिला भारतीय बौध्दमहासभेच्या सौ.सुरेखा सदाफुले,कुसूम साळवे,अरुणा सदाफुले आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
जामखेडमधून लाँग मार्च पुढे कर्जत मार्गे मुंबईकडे रवाना झाला. मंत्रालयावर धडक देऊन मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
Leave a Reply