जामखेड न्युज——-
सारोळा ते राजुरी कोल्हेवस्ती सुरू असलेल्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे काम निकृष्ट
दर्जेदार काम करावे अन्यथा ग्रामस्थ तीव्र आंदोलन करणार
जामखेड तालुक्यातील राजुरी येथील सारोळा ते राजुरी कोल्हेवस्ती येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून होत असलेला कामासंदर्भात ग्रामस्थांनी पोलखोल केली आहे. रस्त्यावर मुरूम न भरता मातीवरच खडी टाकलेली आहे. यामुळे दर्जेदार काम होणार नाही ताबडतोब नियमानुसार इस्टीमेट नुसार दर्जेदार काम करावे अन्यथा राजुरी ग्रामस्थ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असा इशारा निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक यांना दिला आहे.

राजुरी येथे सारोळा ते कोल्हे वस्ती रस्त्याचे काम चालू असून हा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून होत आहे, सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असले बाबत ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे.

याबाबत ठेकेदारास विचारणा केली असता ठेकेदार उडवा उडवीची उत्तरे देत आहे, तरी आपण सदर कामा संदर्भात व दर्जाबाबत वेळेवर लक्ष घालून उचित कार्यवाही आपल्या स्तरावरून करण्यात यावी, अन्यथा ग्रामस्थांचा सदर कामास विरोध असेल असे निवेदनात म्हटले आहे.

रस्ता उकरून त्यात मुरूम भरून तो रोलरच्या साहाय्याने दबाई करणे व नंतर खडी करण करणे आवश्यक आहे पण रस्ता न उकरता मातीवरच खडी टाकली आहे. यामुळे रस्ता लवकर खराब होणार आहे.




