Monday, January 26, 2026
Home ताज्या बातम्या झुंबरताईं शिकारे यांना स्टेट बँकेच्या अपघाती विम्याचा ४० लाखांचा आधार सहा...

झुंबरताईं शिकारे यांना स्टेट बँकेच्या अपघाती विम्याचा ४० लाखांचा आधार सहा महिन्यांपुर्वी पती व मुलाचा झाला होता विजेच्या धक्क्याने मृत्यू

0
689

जामखेड न्युज—–

झुंबरताईं शिकारे यांना स्टेट बँकेच्या अपघाती विम्याचा ४० लाखांचा आधार

सहा महिन्यांपुर्वी पती व मुलाचा झाला होता विजेच्या धक्क्याने मृत्यू

जामखेड तालुक्यातील बाळगव्हाण येथील शिकारे कुटुंबावर २३ जून २०२५ रोजी काळाने घाला घातला. शेतात खत टाकण्यासाठी गेलेले काकासाहेब शिकारे (वय ४२) आणि त्यांचा अल्पवयीन मुलगा महेश (वय १५) हे तुटलेल्या विद्युत तारेचा अंदाज न आल्याने विजेचा धक्का लागून जागीच मृत्युमुखी पडले. दुसऱ्या दिवशी बाप-लेकांवर एकाच चितेत अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला.

वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वीजतारा तुटलेल्या होत्या. याबाबत वारंवार तक्रारी करूनही त्या वेळेत दुरुस्त न झाल्याने निष्काळजी कारभाराचे निखारे या कुटुंबावर कोसळले. कुटुंबाचा कर्ता पुरुष आणि आशेचा आधारवड हरपल्याने पत्नी झुंबरताई शिकारे व उर्वरित कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले.

याच पार्श्वभूमीवर भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया, जामखेड शाखेने दाखवलेली तत्परता आणि माणुसकी शिकारे कुटुंबासाठी आधार ठरली. काकासाहेब शिकारे यांनी २८ जानेवारी २०२५ रोजी एसबीआयच्या वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीचा हप्ता भरलेला होता. ही बाब लक्षात येताच बँकेच्या अधिकाऱ्यांनी केवळ कर्तव्यापुरते न थांबता मानवी संवेदनशीलतेतून तात्काळ पुढाकार घेतला.

अपघाती मृत्यूच्या नोंदी, पंचनामा, वारस दाखला आदी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विमा दावा प्रस्ताव तयार करण्यात आला. शाखा पातळीवरून वरिष्ठ कार्यालयाशी सातत्यपूर्ण समन्वय साधत या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात आला. परिणामी, अवघ्या काही महिन्यांत विमा दावा मंजूर होऊन झुंबरताई शिकारे यांना तब्बल ४० लाख रुपयांचा विमा धनादेश मिळाला.

या धनादेशाचे वितरण प्रभारी तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, एसबीआयचे शाखाधिकारी अंकुश जाधव, उपप्रबंधक अनिल बिरंगळ, सहाय्यक प्रबंधक बाळासाहेब साळवे, मंडलाधिकारी इरप्पा नातू काळे यांच्यासह बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आयुष्यातील सर्वात मोठ्या दु:खाच्या क्षणी मिळालेला हा आर्थिक आधार झुंबरताईंसाठी अंधारात दिसलेला आशेचा किरण ठरला आहे.

एसबीआयची वैयक्तिक अपघात विमा पॉलिसी ही अल्प प्रीमियममध्ये अपघाती मृत्यू किंवा कायम अपंगत्वाच्या प्रसंगी मोठा आर्थिक आधार देणारी योजना असून ग्रामीण व शेतकरी कुटुंबांसाठी ती अत्यंत उपयुक्त आहे. मात्र माहितीअभावी किंवा मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक कुटुंबे अशा लाभांपासून वंचित राहतात. जामखेड शाखेने दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता ही केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून, व्यवस्थेवरील विश्वास जपणारी कृती ठरली आहे.
ही बातमी केवळ विमा रकमेची नाही, तर संकटात सापडलेल्या कुटुंबाला सावरणाऱ्या व्यवस्थेची आणि कागदोपत्री नियमांच्या पलीकडे जाऊन माणुसकी जपणाऱ्या बँकिंग सेवेची सशक्त साक्ष आहे.

चौकट

वैयक्तिक अपघात विमा : गरिबांसाठी सुरक्षेची ढाल
• अल्प प्रीमियममध्ये मोठे संरक्षण
• अपघाती मृत्यू व कायम अपंगत्वास आर्थिक आधार
• ग्रामीण व शेतकरी कुटुंबांसाठी अत्यंत उपयुक्त योजना
• योग्य मार्गदर्शन मिळाल्यास वेळेत लाभ मिळणे शक्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!