कालिका पोद्दार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी दातांची तपासणी व निगा याविषयी मार्गदर्शन
साधना दाताचा दवाखाना तर्फे डॉ श्रुती देशमुख यांचे मार्गदर्शन
जामखेड शहरातील साधना दाताचा दवाखाना तर्फे कालिका पोद्दार लर्न स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची दाताची तपासणी करण्यात आली तसेच दाताची निगराणी कशी करायची त्यासंदर्भात डॉक्टर श्रुती रोहित देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व माहिती दिली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. श्रुती रोहित देशमुख म्हणाल्या की, मौखिक आरोग्य चांगले असेल, तर शरीराचे आरोग्य चांगले राहू शकते. यामध्ये दातांची भूमिका सर्वांत महत्त्वाची आहे. आपण खात असलेले अन्न नीट पचन होण्यासाठी सर्वप्रथम ते नीट प्रकारे चावले गेलेले असणे आवश्यक असते.
यासाठी दात सुस्थितीत असणे आवश्यक असते. म्हणूनच लहानपणापासून आपल्याकडे दातांची काळजी घेण्याबाबत सल्ला दिला जातो; पण लहान मुलांना सतत काही तरी गोड खायला आवडते. त्यामध्ये गोळ्या, चॉकलेट, लॉलीपॉप हे असतेच. त्यातून मुलांच्या दात किडणे, दंतदुखी या समस्या वाढत जातात.
रोजच्या दिनक्रमात दात घासणे, तोंड धुणे आणि योग्य आहाराचा समावेश करणे, त्याचबरोबर दातांच्या डॉक्टरांकडून दातांची, तोंडाची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
लहान मुलांना गोड पदार्थ कमी प्रमाणात द्यावेत. त्याऐवजी पोषक आरोग्यदायी असे दूध, फळे आणि भाज्या असा आहार द्या.
अमेरिकन अॅकॅडमी ऑफ पेडिआट्रिक डेन्टीस्ट्रीच्या म्हणण्यानुसार, दातांवर पडणारे डाग टाळण्यासाठी टूथपेस्टचा वापर करण्यास हरकत नाही. मुलांच्या हातात ब्रश देऊन दात घासण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे.