साकतचे भुमिपुत्र रोहित घोडेस्वार यांच्या राँकेट फाँर लर्निंग मिशन उपकरण जिल्ह्यात प्रथम, राज्यस्तरावर निवड जलसंपदा मंत्री मा. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान
साकतचे भुमिपुत्र रोहित घोडेस्वार यांच्या राँकेट फाँर लर्निंग मिशन उपकरण जिल्ह्यात प्रथम, राज्यस्तरावर निवड
जलसंपदा मंत्री मा. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते सन्मान
जामखेड -अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान–गणित अध्यापक संघ, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड येथील श्री नागेश विद्यालयात दि. ८ व ९ जानेवारी रोजी भरलेल्या ५३ व्या जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनात (२०२५–२६) मोठ्या उत्साहात स्पर्धा पार पडल्या. “विकसित व आत्मनिर्भर भारतासाठी STEM” या संकल्पनेवर आधारित प्रदर्शनात जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील विद्यार्थी तसेच शिक्षकांनी नाविन्यपूर्ण व संशोधनाधारित प्रकल्प सादर केले. या प्रदर्शनात माध्यमिक शिक्षक गटातून साकतचे भुमिपुत्र रोहित घोडेस्वार सर (ल. ना. होशिंग विद्यालय, जामखेड) यांनी प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या या यशाबद्दल राज्याचे जलसंपदा मंत्री मा. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा आणि विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी घोडेस्वार सरांनी “Rocket for Learning Mission” हे अभिनव शैक्षणिक साहित्य विकसित केले आहे. या प्रकल्पाला जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळून राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झाल्याने साकत गावासह जामखेड तालुक्याचा मान उंचावला आहे.
रोहित घोडेस्वार सरांना त्यांच्या प्रयोगशील व नाविन्यपूर्ण कामगिरीमुळे ‘मिसाईल मॅन’ म्हणून विशेष ओळख प्राप्त झाली आहे. २०१९ साली त्यांनी विद्यार्थ्यांसह पी.एस.एल.व्ही. रॉकेटची ८ फूट उंच व २८ किलो वजनाची प्रतिकृती तयार केली होती, ज्याला राष्ट्रीय पातळीवर दाद मिळाली. त्यांच्या विविध वैज्ञानिक मॉडेल्सना राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळत आला आहे.
आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, संशोधनाची आवड निर्माण करणारे उपक्रम आणि मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचा मानस या माध्यमातून ते समाजकार्यातही पुढाकार घेत आहेत.
जिल्हा बँकेचे संचालक व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात रोहित सरांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात आला.
जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाची ही कामगिरी साकतच्या भुमिपुत्राचा अभिमान वाढवणारी ठरली असून राज्यस्तरावरही यशाची शिखरे गाठतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.