जामखेड न्युज – – –
शिक्षण संस्था चालकांकडून मंजुरीच्या कामासाठी चालकामार्फत आठ लाख रुपयांची लाच घेणाऱ्या नाशिकच्या शिक्षणाधिका-यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभगाने अटक केली. विशेष म्हणजे आजच त्यांनी वकिलामार्फत अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता.
झनकर यांच्याकडं कोट्यवधींची माया
शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी आठ लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांचा पाय आणखी खोलात गेला. झनकर यांच्याकडे कोट्यवधींची ‘माया’ आहे. विशेष म्हणजे शासनानेदेखील शिक्षण आयुक्तांना वैशाली झनकर यांच्या निलंबनाचे आदेश दिले.
झनकर-वीर फरार होत्या. त्यांनी आपली रवानगी तुरुंगात होऊ नये, म्हणून प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. यासाठी त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या वतीने अॅड. अविनाश भिडे यांनी हा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज दाखल केला होता. या अटकपूर्व जामीन अर्जावर शनिवारी सुनावणी होणार आहे.
काय घडले?
शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी आठ लाख रुपयांची लाच मागितली होती. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आले. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.
चालकाच्या माध्यमातून लाचखोरी
वीर यांच्या शासकीय वाहनावरील चालक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले याने तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारली. याचवेळी चालक येवले यास पथकाने रंगेहात पकडले. त्यानंतर त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने झनकर-वीर यांचे नाव घेतले. त्यानंतर पथकाने तत्काळ थेट झनकर यांच्या दालनात जाऊन चौकशी केली.