जामखेड न्युज – – –
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आवाज काढून फसवणुकीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने पुण्यातून या दोन्ही आरोपींना जेरबंद केले. विकास गुरव ( 51 ) आणि किरण काकडे ( 26) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने या दोघांचीही 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास गुरव आणि किरण काकडे दोघेही पुण्यातील रहिवाशी आहेत. ते सध्या बेरोजगार आहेत. यापैकी किरण काकडे याने लॅन्डलाईन क्रमांकावरुन मंत्रालयात फोन केला होता. आपण शरद पवार बोलत असून एका अधिकाऱ्याची तात्काळ बदली करा, असे फर्मान मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिले होते. त्यावेळी आपण सिल्व्हर ओकवरून बोलत असल्याचे आरोपीने म्हटले होते. मात्र, शरद पवार त्यावेळी दिल्लीत होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी चौकशी केली असता बनाव उघडकीस आला होता. त्यानंतर गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करुन तपासाला सुरुवात झाली होती.
चाकणमध्येही सारखाच प्रकार
शरद पवार यांच्या आवाजाचा वापर करून फोन करण्यात आला. प्रतापराव वामन खंडेभारड यांच्याकडे संबंधित व्यवहारामध्ये अडकलेले पैशाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्या चाकणमध्ये घडलाय. या प्रकरणी प्रताप खांडेभारड यांनी चाकण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. धीरज धनाजी पठारे असं मुख्य आरोपीचे नाव आहे. त्याचे साथीदार गुरव याने शरद पवार यांचा आवाज काढून खांडेभराड यांना पैशाची मागणी केली होती. त्यांना किरण काकडे याची ही साथ मिळाली होती.
प्रताप खांडेभारड यांनी 2014 ला धीरज पठारे
यांच्याकडून 1 कोटी 20 लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्या साठी खांडेभराड यांनी पठारे यांना 13 एकर जमीन ही दिली होतो. मात्र चक्रवाढ व्याज लावल्याने रक्कम वाढतच होती. त्यातच जमिनीचा व्यवहार होत नाही असे कारण सांगून पठारेने पुन्हा जानेवारी पासून पैशांची मागणी केली.
पैसे देत नाही म्हणून पठारे याने साथीदारांच्या मदतीने संगणक आणि इंटरनेटचा वापर करत थेट शरद पवार यांच्या घरचा नंबर इंटरनेट फोनसाठी वापरला आणि खांडेभराड यांच्याकडे पैशांची मागणी केली. इंटरनेटचा वापर झाल्याने मुंबई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींना अटक केलीय. त्यांना 20 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलीय. मुंबई नंतर खांडेभराड हे चाकणमध्ये राहत असल्याने आरोपी विरोधात चाकणमध्येही गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबई पोलिसांच्या तपासानंतर पिंपरी चिंचवड पोलिस आरोपींची चौकशी करणार आहेत.