सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी अँब्युलन्स घेऊन घटनास्थळी दाखल
जामखेड तालुक्यातील बटेवाडी येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत सचिन बाबासाहेब खरात (वय ३८ वर्षे) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज उघडकीस आली आहे.
संतोष प्रभू खरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. फिर्यादीनुसार, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सचिन खरात हे काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी असलेले अजिनाथ शंकर खरात यांनी त्यांच्या विहिरीत सचिन याची चप्पला तरंगताना पाहिल्या आणि एकच धावपळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना विकास मासाळ यांनी फोनवरून कळविले. तत्काळ प्रतिसाद देत संजय कोठारी यांनी आपली रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिकांच्या मदतीने पाण्यात बुडालेल्या सचिन खरात यांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, जामखेड येथे दाखल केले.
तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज शिंदे यांनी तपासणी करून सचिन खरात यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, पो.हे.कॉ. ५०८ टी.बी. सोनवणे यांच्या सहकार्याने जामखेड पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सदरची माहिती जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चव्हाण यांना सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख आणि पोलीस दीपक बोराटे करीत आहेत.
यावेळी उपस्थित संपत नाना राळेभात आणि गणेश आजबे इतरांनी मदत केली यावेळी बोलताना माजी नगरसेवक गणेश आजबे म्हणाले संजूकाका कोठारी यांना मी बऱ्याच वर्षापासून पाहतोय परंतु त्यांची निस्वार्थी सेवा आणि त्वरित ॲम्बुलन्स उपलब्ध खरोखर खूप गर्वाची गोष्ट आहे.