जामखेड न्युज – – –
भारताला एथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकवून देणाऱ्या नीरज चोप्राचं देशभरातून कौतुक होत असतानाच त्याच्या जातीवरही चर्चा होताना दिसत आहे. नीरज चोप्रा हा रोड मराठा असून त्यांचं पानिपतशी नातं असल्याचं म्हटलं जात आहे. रोड मराठे नेमके कोण आहेत? पानिपतशी त्यांचं नेमकं काय नातं आहे? यावर टाकलेला हा प्रकाश.
1761मध्ये नीरज चोप्राचे पूर्वज पेशवे बाळाजी बाजीराव यांच्याबाजूने पानिपतच्या तिसऱ्या युद्धात उतरले होते. अफगानचा शासक अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये हे युद्ध झालं होतं. या युद्धानंतर नीरजचे पूर्वज पानिपतमध्येच थांबले.
पानिपतची कहाणी काय होती?
पानिपतचं युद्ध हे एक निर्णायक युद्ध होतं. या युद्धात आप्तस्वकीयांनी अब्दालीला साथ दिली. त्यामुळे मराठ्यांचा या युद्धात पराभव झाला. या पराभवामुळे देशाचं मोठं नुकसान झालं. या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. पण हिंदुस्थानावर राज्य कोम करेल हे अजूनही ठरलं नव्हतं, असं इतिहास संशोधकांचं म्हणणं आहे. त्याकाळात इंग्रजांचीही ताकद वाढलेली होती. ते देशभर पसरले होते. मोगलांचं साम्राज्य लयाला जाण्याचा हा काळ होता. देशात मराठ्यांची ताकद मोठी होती. त्यामुळे मोगल गेल्यानंतर देशावर मराठ्यांचंच राज्य येईल हे निश्चित होतं. मात्र पानिपताच्या पराभववामुळे मराठ्यांची ताकद क्षीण झाली. तर दुसरीकडे इंग्रजांनी उचल खाल्ली होती. अब्दालीने पानिपतनंतर लुटमार आणि रक्तपात घडवून आणला. त्यानंतर तो अफगाणिस्तानला गेला. आणि हिंदुस्थान इंग्रजांचा गुलाम झाला, असं इतिहासकार सांगतात.
रोड राजाच्या नावाने नवी ओळख
14 जानेवारी 1761मध्ये मराठ्यांचा पराभव झाला. सुमारे 50 हजार मराठा जवानांना या युद्धात वीर मरण आलं. या युद्धानंतर काही सैनिक पळून गेले. काही जण याच भागात लपून राहिले. काहींनी आपली ओळख लपवली. मात्र, ओळखू जाऊ नये म्हणून त्यांनी येथील रोड नावाच्या राजाच्या नावाने स्वत:ची ओळख सांगण्यास सुरुवात केली. तेव्हापासून पानिपतमध्ये पराभूत झालेल्या आणि याच परिसरात राहिलेल्यांना रोड मराठा म्हणून संबोधलं जाऊ लागलं, असं इतिहासकार सांगतात.
भाषेवर मराठीचा प्रभाव
या रोड मराठ्यांना आपलं मूळ माहीत नव्हतं. पण त्यांनी आपल्या प्रथा आणि परंपरांचं जतन केलं. म्हणूनच आजही रोड मराठ्यांच्या परंपरा आणि महाराष्ट्रातील प्रथा, परंपरा समान दिसतात. हे रोड मराठा हिंदी बोलतात. पण त्यांच्या बोलण्यात अधूनमधून मराठी शब्द डोकावत असतात. आईन-ए-अकबरीमध्ये रोड मराठ्यांचा उल्लेख नाही. त्यांचा संदर्भ पानिपतानंतरच्या बखरींमधून आढळून येतो.
लोकसंख्या किती?
रोड मराठा प्रामुख्याने पानिपत, करनाल, सोनीपत, कॅथल आणि रोहतक परिसरात राहतात. रोड मराठ्यांची ठोस आकडेवारी पुढे आलेली नाही. मात्र, त्यांची संख्या सहा ते आठ लाख असावी असं सांगितलं जातं.