मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही वंशाची पणती – गोविंद महाराज गायकवाड जामखेड शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समाजप्रबोधना बरोबर हसून हसून बेजार करणारे भारूडे
मुलगा वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही वंशाची पणती – गोविंद महाराज गायकवाड
जामखेड शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात समाजप्रबोधना बरोबर हसून हसून बेजार करणारे भारूडे
आजच्या युगात आजही मुलींना कमी लेखले जात आहे. परंतु मुलगा हा वंशाचा दिवा असेल तर मुलगी वंशाची पणती आहे, असे प्रतिपादन भारुडकार गोविंद महाराज गायकवाड यांनी केले.
श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शुक्रवारी 6 जून रोजी रात्री 8 ते 10 भारूडाचा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारूड सम्राट गोविंद महाराज गायकवाड भारूड मंडळ आळंदी देवाची यांचा तुफान विनोदी सोंगी भारूड कार्यक्रम सादरीकरण झाले. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे पांडुरंग भोसले, हभप राजाभाऊ म्हेत्रे, हभप हरीभाऊ काळे, हभप अशोक सपकाळ याच बरोबर गायकवाड महाराज यांच्या बरोबर असलेली सर्व टीम तसेच मोठ्या प्रमाणात प्रेषक महिला, लहान मुले हजर होते.
आज शनिवारी 7 जून रोजी रात्री 8 ते 10 पर्यंत शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांचे 14 वे वंशज हभप श्री योगीराज महाराज गोसावी श्री क्षेत्र पैठण जि संभाजीनगर यांचे कीर्तन होईल.
रविवारी दि. 8 जून रोजी रात्री 8 ते 10 शिवशाहीर हभप कल्याण महाराज काळे शेवगाव यांचे कीर्तन होईल तसेच सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. वरील सर्व कार्यक्रमाचे ठिकाण छत्रपती संभाजी महाराज मार्ग तहसील कार्यालयाच्या समोर जामखेड येथे असेल.
सोमवार 9 जुन रोजी पहाटे सप्तनद्या, गडकोट किल्ले, तीर्थक्षेत्र येथून आणलेल्या पवित्र जलाने शिवछत्रपतींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येईल.
सोमवार 9 जून रोजी दुपारी 2.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती पासून श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे.
भारूडाचा कार्यक्रम सादर करताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात रयतेचे राज्य होते. शेतकरी सुखी समाधानी होता. आज शेतकरी समाधानी नाही. त्यांच्या शेतमालाला योग्य भाव ठरविण्याचा अधिकार त्यांना नाही. नोकरी करणारा मुलगा असेल तर मुलगी त्याला मिळते. शेतकरी मुलगा असेल तर मुलगी मिळत नाही. या देशाचा शेतकरी हा खरा राजा आहे. तो सर्वांचा पोशिंदा आहे. परंतु शेतकऱ्यांची अवस्था आज आपण बिकट केली आहे.
मुलगी द्यायची असेल, तर शेतकऱ्यांच्या मुलाला द्या, ती सुखात संसार करेल, मुलगा हा वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही वंशाची पणती आहे. तिला जपून ठेवा. दान तर प्रत्येक व्यक्ती करतो. परंतु कन्यादान करण्याचे भाग्य लागते, असे प्रतिपादन गोविंद महाराज गायकवाड यानी केले. आजची पिढी तंबाखू व गुटख्याच्या आहारी गेली आहे. मुलगा शाळेतून आल्यानंतर त्याच्या तोंडाचा वास घ्या, आणि तेथेच सरळ करा, असा उपदेश त्यानी केला. तब्बल तीन तास हसत खेळत त्यांनी समाज प्रबोधन केले.