जामखेड न्युज——
जामखेड तालुक्यात ठिकठिकाणी चुरशीने मतदान
मतदानासाठी लांबच लांब रांगा, दोन्ही उमेदवाराच्या पैसे वाटपाच्या घटना
राज्यातील हायहोल्टेज लढतीपैकी कर्जत जामखेड च्या लढतीकडे पाहिले जात होते. सर्वच ठिकाणी चुरशीने मतदान झाले. जामखेड शहरातील केंद्रावर सकाळ पासून गर्दी होती त्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदान अवघे 20 टक्के झाले होते. यानंतर मात्र मतदानासाठी नागरीकांनी गर्दी केली होती. दुपारनंतर मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले होते जामखेड शहरातील काही मतदान केंद्र सुशोभित केले होते. फक्त महिला कर्मचारी व अपंग कर्मचारी असलेले मतदान केंद्र लक्षवेधी ठरले. जामखेड तालुक्यातील नान्नज येथे मंगळवारी व बुधवारी मतेवाडी तसेच कर्जत येथे लकी हॉटेल येथे पैसे वाटप प्रकार घडला याबाबत गुन्हे दाखल झाले आहेत. जामखेड व कर्जत तालुक्यात किरकोळ प्रकार वगळता कोठेही अनुचित प्रकार घडला नाही रात्री उशीरापर्यंत 75 . 15 टक्के मतदान झाल्याची माहिती मिळाली आहे.
कर्जत जामखेड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार प्रा. राम शिंदे व महाविकास आघाडीचे उमेदवार रोहीत पवार यांच्यात सरळ लढत लक्षवेधी ठरणार असल्याने या मतदारसंघावर निवडणूक आयोगाने विशेष लक्ष केंद्रित केले होते व मोठय़ा प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आली होती. सकाळी आठ वाजता आ. राम शिंदे यांनी कुटुंबासह चोंडी येथील मतदान केंद्रावर मतदानाचा अधिकार बजावला. निवडणूक अधिकारी यांनी जामखेड शहरातील आदर्श मतदान केंद्र म्हणून नागेश कन्या विद्यालय तसेच युवा कर्मचारी संचलित मतदान केंद्र नागेश कन्या विद्यालय व पडदा नशीन मतदान केंद्र जि. प. प्राथ. मुलांची शाळा, जामखेड येथे तयार केले होते.
जामखेड शहरसह तालुक्यातील मतदान केंद्रावर सकाळी अकरा वाजेपर्यंत अल्पसा प्रतिसाद होता. दुपारी बारा नंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडला होता. 96 नंबरच्या केंद्रांवर एकुण मतदार संख्या १४७६ असल्यामुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या. हजारापेक्षा जास्त मतदान असेल तर दुसरे केंद्र केले पाहिजे. एक मतदान प्रक्रिया होण्यासाठी वीस सेकंद लागतात एकच मशीन असल्याने गर्दी होती त्यामुळे मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. अरणगाव, पिंपरखेड, जवळा याठिकाणी लांबच्या लांब रांगा मतदानासाठी लागल्या होत्या. मतदान केंद्राच्या दोनशे मिटर अंतरावर राम शिंदे व रोहीत पवार यांचे बुथ ठिक ठिकाणी लागले होते व मोठय़ा प्रमाणावर कार्यकर्ते असल्याने मतदान आणण्यासाठी चुरस लागली होती. यावेळी महिला मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्या होत्या त्यामुळे सर्वच मतदार केंद्रात गर्दी होती.