जामखेड न्युज——
जिल्ह्यात शासकीय ३१२ तर खाजगी संस्थेमार्फत हजारो टँकर
जलजीवन’च्या हजारो कोटींचे काय?
केंद्र व राज्य शासनाने गेल्या चार वर्षांपूर्वी जलजीवन मिशन ही महात्त्वाकांक्षी योजना आणून प्रत्येक घरात नळाने प्रतिदिन माणसी ५५ लिटर पाणी देण्याचा निर्णय घेतला. यासाठी जिल्ह्यात तब्बल ५ हजार कोटींच्या पाणी योजनेची कामे सुरू आहेत. मात्र, तरीही टंचाईच्या झळा कमी होताना दिसत नाहीत. पुढील वर्षी जूनपर्यंतची टंचाई लक्षात घेता जिल्हा परिषदेने ८४ कोटींचा टंचाई आराखडा तयार केला आहे. तरीही अहमदनगर जिल्ह्यात शासकीय ३१२ तर खाजगी हजारो टँकर सुरू आहेत.
मग ‘जलजीवन’च्या हजारो कोटींचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.अहमदनगर जिल्हा हा अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याच्या उत्तर भागात धरणांची संख्या जास्त असल्याने काही अंशी पाण्याची सोय आहे. मात्र, दक्षिण भागातील तालुक्यांत दुष्काळी स्थिती कायम असते. दरम्यान, पिण्याच्या पाण्याची कायमची टंचाई दूर करण्यासाठी पूर्ण देशभर केंद्र शासनाने जलजीवन मिशन योजना २०१९ पासून सुरू केली.
यात ५० टक्के हिस्सा राज्याचाही आहे. प्रतिदिन माणसी ५५ लिटर पाणी नळाने थेट कुटुंबाच्या दारापर्यंत नेण्याचे उद्दिष्ट शासनाने ठेवले. त्यासाठी जिल्ह्यात २०२९ पासून जलजीवनचे हे काम सुरू झाले. यात काही नवीन पाणी योजना, तसेच काही ठिकाणी आहे त्या पाणी योजनांची दुरुस्ती केली जात आहे. २०२४ला ही योजना पूर्ण करायची आहे. परंतु चार वर्षांनंतरही अनेक कामे अजून अपूर्णावस्थेतच आहेत. १० टक्के लोकांंनाही या योजनेतून अद्याप पाणी मिळालेले नाही.जिल्हा परिषदेकडे १३३८ कोटींच्या योजनाजलजीवन मिशनमध्ये जिल्हा परिषदेकडे एकूण ८३० योजना असून, त्यातून ९२७ गावांना पाणी मिळणार आहे.
त्यासाठी १३३८ कोटींच्या निधीची तरतूद आहे. आतापर्यंत यात ३०० योजनांची यशस्वी चाचणी झाली असल्याचे जिल्हा परिषदेचे म्हणणे आहे. मात्र, अद्याप या योजना उद्घाटनाअभावी सुरू होऊ शकलेल्या नाहीत. काहींचे अंतिम टप्प्यातील काम बाकी आहे. एकीकडे जिल्ह्यात जलजीवनमधून सुमारे पाच हजार कोटींच्या पाणी योजनांची कामे सुरू असतानाही आणखी ८४ कोटींचा टंचाई आराखडा करावा लागणे, म्हणजे चार वर्षांत जलजीवनची काय फलनिष्पत्ती आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.एमजेपीकडे साडेतीन हजार कोटींच्या योजना ग्रामीण भागात पाण्याचे उद्भव कोरडे पडू लागल्याने दिवसेंदिवस टँकरच्या मागणीत वाढ होत आहे. गेल्या दीड महिन्यांपासून जिल्हा प्रशासन लोकसभा निवडणुकीत व्यस्त होते. परंतु आता निवडणुका संपल्याने पाणीटंचाईला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
तहानलेल्या लोकांना पाणीपुरवठा करण्यावर प्रशासनाला भर द्यावा लागणार आहे. सध्या जिल्ह्यात ३१२ टँकरने २९१ गावे व १५४४ वाडी-वस्तीवरील ५ लाख ७० हजार लोकांना पाणीपुरवठा सुरू आहे.
त्यातच अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे काही ठिकाणी सुरू असल्याने पंचनामे करण्यासाठी तारेवरची कसरत प्रशासनाला करावी लागत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षाही कमी पाऊस झाल्याने जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात टँकरच्या मागणीला सुरुवात झाली.
अर्थात टँकरची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास फेब्रुवारी महिना उजाडला. त्यानंतर खऱ्या अर्थाने टँकरमध्ये वाढ होऊ लागली. आज अखेर जिल्ह्यात ३१२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सर्वाधिक पाणीटंचाईची तीव्रता पाथर्डी तालुक्यात असून निम्म्याहून अधिक तालुक्याला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
जिल्ह्यात कुठे किती पाण्याचे टँकर सुरु?
संगमनेर – 27 टँकर
अकोले – 5
कोपरगाव – 3
नेवासा – 3
नगर – 29
पारनेर – 34
पाथर्डी – 99
शेवगाव – 11
कर्जत – 42
जामखेड – 23
श्रीगोंदा – 9
अहमदनगरला जिल्ह्यात ऐन उन्हाळ्यात पाणी संकट निर्माण झालीय. पाहिजे तितका पाऊस न पडल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झालीय. तब्बल सहा-सहा दिवस पाणी येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात 312 टँकर सुरु करण्यात आले आहेत. सर्वाधिक 99 पिण्याचे टँकर हे पाथर्डी तालुक्यात सुरु करण्यात आले आहेत.
चौकट
कर्जत जामखेड तालुक्यात आमदार रोहित पवार यांच्या बारामती अँग्रो तर्फे मोठ्या प्रमाणात टँकर सुरू आहेत तसेच डॉ सुजय विखे यांनीही अनेक टँकर सुरू केले आहेत. शासकीय टँकर बरोबर खाजगी हजारो टँकर सुरू आहेत.